
छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत शनिवारी संस्थेचे सदस्य मधुकर अण्णा हरिभाऊ मुळे यांचे मंगळवारी निधन झाले. त्यानिमित्त शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे आणि प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख उपस्थित होते. या शोक सभेत पद्माकरराव मुळे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, ‘एक चतुरस्त्र, शांत, निर्गवी, निरलस व कुशल संघटक म्हणून मधुकर अण्णा सर्वांना परिचित होते. सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ते कार्यरत असले तरी समाज विकासाच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रातील त्यांचं कार्य कर्तुत्व अतुलनीय आणि विशेष उल्लेखनीय आहे.
घरची परिस्थिती अतिसामान्य होती. चार बहिणी व चार भाऊ आजी-आजोबा आमचे चुलते व इतर कुटुंबे यांचा सर्व भार आमच्या आई-वडीलचं वाहत होते. कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, त्यागाची भावना, आत्मीयता याचे सर्व बाळकडू आई वडिल आणि मधुकर अण्णा यांच्याकडून आम्ही शिकलो. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा निर्वाह एकट्या वडिलांच्या नोकरीवर होणे शक्य नव्हते म्हणून मधुकरअण्णांनी आपले स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडून केवळ इंटरपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीपेक्षा व्यवसाय अधिक चांगला. कारण त्यात कुटुंबातील अधिक लोकांना अधिक काम करता येईल. या दूरदृष्टीने विचार करून त्यांनी व्यवसायाचे क्षेत्र निवडले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पैसा अर्थात फारसे भांडवल नसताना अमर्याद जिद्द, चिकाटी, उच्च महत्वकांक्षा, प्रामाणिक आणि विधायक दृष्टिकोन ‘यांच्याचं’ भांडवलावर मधुकर अण्णांनी एक भव्यदिव्य स्वप्न पाहिलेले होते. अपार कष्टाने त्यांनी हे स्वप्न आज साकार केलेले आपणास पाहावयास मिळते. आज आपणास मुळे कुटुंबियाचे व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील फार मोठे कार्य दिसून येते. या सर्व उन्नतीच्या पाठीमागे मधुकर अण्णांची तपश्चर्या आहे.
यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ लता काळे, कृषी महाविद्यालय संचालक डॉ जगदीश जहागीरदार, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ गणेश डोंगरे, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ प्रवीण बैनाडे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ शशिकांत ढिकले, मनुष्यबळ विकास अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील आणि उपप्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.