
डॉ एस एच जाफरी यांचा गौरव
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी २० क्रिकेट स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात टाटा हॉस्पिटल संघाचे दिग्गज क्रिकेटपटू डॉ एस एच जाफरी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत नानावटी हॉस्पिटल संघाने विजेतेपद पटकावले.
शिवाजी पार्क येथे झालेल्या या सोहळ्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या हस्ते आणि उद्योजक परविंदरसिंग राठोर, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे डॉ विस्पी आन्टीया, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ जाफरी यांना शाल, श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
क्रिकेट आणि समाजकार्याचा मिलाफ
डॉ जाफरी यांनी २५ वर्षे टाटा हॉस्पिटल क्रिकेट संघाचे नेतृत्व केले असून, क्रिकेट संघटनेसह कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत गिरनार आणि आयडियल क्रिकेट स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवले आहे. विशेष म्हणजे गिरनार स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक करण्याचा विक्रम आजही त्यांच्या नावावर आहे.
निवृत्तीनंतरही ते टाटा हॉस्पिटल संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून, क्रिकेट प्रशासनातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ते वर्ल्ड कप २०११ चे मीडिया मॅनेजर आणि वर्ल्ड कप २०२३ चे ऑपरेशनल मॅनेजर राहिले आहेत. त्याशिवाय भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका एकदिवसीय व टी २० दौऱ्यात संघ व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. क्रिकेटसह सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान असल्याने त्यांचा हा विशेष गौरव करण्यात आला.
नानावटी हॉस्पिटल संघ विजेता
या प्रतिष्ठेच्या आंतर हॉस्पिटल टी २० क्रिकेट स्पर्धेत नानावटी हॉस्पिटल संघाने विजेतेपद पटकावले, तर ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघ उपविजेता ठरला. केडीए हॉस्पिटल अंधेरी आणि जेजे हॉस्पिटलने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. लीलावती हॉस्पिटल, सोमैया हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि केडीए हॉस्पिटल नवी मुंबई यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आत्माराम मोरे प्रतिष्ठानने विशेष परिश्रम घेतले. हॉस्पिटल क्षेत्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी ही क्रिकेट स्पर्धा प्रेरणादायी ठरली असून, भविष्यात अशा अधिक संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.