
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर सहा विकेटने मिळवलेला विजय ‘गोड’ असल्याचे श्रेयस अय्यर याने म्हटले आहे, कारण हा विजय एका प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध होता आणि त्याभोवती खूप बाह्य दबाव होता. या विजयासह भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. श्रेयसने ६७ चेंडूत ५६ धावांचे योगदान दिले.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘मी पाकिस्तानमध्ये इतके सामने खेळलेले नाहीत त्यामुळे मला कसे वाटते हे माहित नाही, पण ते एक तटस्थ ठिकाण आहे आणि दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक होते. पाकिस्तान संघाविरुद्ध कोणताही विजय गोड असतो. कारण सामने नेहमीच स्पर्धात्मक असतात. ‘हे एक मोठे आव्हान’ आहे कारण बाह्य दबाव देखील खूप आहे. हा माझा पाकिस्तान संघाविरुद्ध तिसरा सामना होता. तथापि, त्याने बाह्य दबाव म्हणजे काय हे स्पष्ट केले नाही.
विराट कोहलीचे कौतुक
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ वे शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीचे कौतुक करताना श्रेयस अय्यर म्हणाला, ‘विराट धावांसाठी संघर्ष करत आहे असे मला कधीच वाटले नाही. तो नेहमीच धावांसाठी भुकेला असतो. मला आठवतंय तो आमच्या आधी एक तास आधी सरावाला आला होता आणि त्याने काही चेंडू खेळले होते आणि तो नेहमीप्रमाणे उत्तम फॉर्ममध्ये दिसत होता.’
पाकिस्तान डावादरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे दोघेही थोड्या काळासाठी मैदानाबाहेर गेल्याने त्यांना तंदुरुस्तीची समस्या असल्याची भीतीही श्रेयसने फेटाळून लावली. अय्यर म्हणाला, ‘माझ्या माहितीप्रमाणे, दोघेही ठीक आहेत.’ फिटनेसचा कोणताही प्रश्न नाही.’