
छत्रपती संभाजीनगर : देहरादून येथे संपन्न झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये केआरएस स्पोर्ट्स अकादमीचे स्टार खेळाडू शुभम सुनील सरकटे व रिद्धी सचिन जैस्वाल यांनी वर्चस्ववादी खेळ करत एक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळात नॅशनल गेम्स मधील पहिले सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, पंच अकॅडमीचे संचालक प्रा प्रवीण रावण शिंदे यांची निवड करण्यात आली होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बालेवाडी क्रीडा संकुलात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या मार्फत प्रशिक्षण वर्ग प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनात नियोजित करण्यात आले होते. या शिबिराचा ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स खेळाडूंना चांगला फायदा मिळाला. खेळाचे बारकावे समजावणे आणि खेळाडूंची मानसिकता व स्पर्धेचे दडपण हाताळणे याचा सराव तसेच खेळी मेळीचे वातावरण व संघाचे वर्चस्व टिकवून ठेवणे याचे धडे प्रशिक्षण या शिबिरात प्रवीण शिंदे यांनी दिले.
त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी राहिला. प्रवीण शिंदे यांचा अनुभव व मार्गदर्शन तसेच खेळाडूंनी केलेले जोरदार प्रदर्शन या जोरावर महाराष्ट्र संघाने ५ पैकी ४ सुवर्णपदक व १ रौप्य पदक प्राप्त करून महाराष्ट्र राज्याचे नाव दैदिप्यमान केले. मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्याला ४ पदक मिळाले होते. परंतु या वर्षी ५ पैकी ५ पदक महाराष्ट्राला मिळाली. त्यामुळे महाराष्ट्राने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. शुभम सरकटे व रिद्धी जैस्वाल यांनी या स्पर्धेत बॅलेन्स, डायनामिक व कम्बाइंन या तीन प्रकारात अव्वल स्थान मिळवत सुवर्ण पदक जिंकले.
या खेळाडूंचे व प्रशिक्षक यांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, महाराष्ट्र जिम्नॅटिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ आदित्य जोशी, सचिव डॉ मकरंद जोशी, डॉ सागर कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष अॅड संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, सचिव हर्षल मोगरे, डॉ विशाल देशपांडे आणि के आर एस स्पोर्ट्स अकादमी अँड जिम्नॅटिक्स केंद्राचे अध्यक्ष रावण शिंदे, उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अरविंद शिंदे, कोषाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ज्योती शिंदे (मोरे) तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी या सर्व खेळाडू, प्रशिक्षक तसेच पालकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.