
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठद्वारे आयोजित आंतर महाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेत डीआरबी सिंधु महाविद्यालय संघाने पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
श्री नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथील क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या गटात डीआरबी सिंधु महाविद्यालय संघाने विजेतेपद पटकावले. तायवाडे कॉलेज कोराडी संघ उपविजेता ठरला. धनवटे नॅशनल कॉलेज संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. मुलींच्या गटात डीआरबी सिंधु महाविद्यालय संघाने अजिंक्यपद संपादन केले. एम बी पटेल देवरी कॉलेज संघाने उपविजेतेपद मिळवले. कमला नेहरू महाविद्यालय आणि नुतन आदर्श महाविद्यालय उमरेड संघ तिसऱ्या स्थानावर राहिले.
या स्पर्धेचे आयोजन श्री नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय कुही, एम बी पटेल कॉलेज देवरी यांनी केले होते.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला श्री नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक अवसरे, बेसबॉल संघटनेचे सचिव जयकुमार रामटेके यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी डॉ प्रवीण लामखाडे, डॉ अमित टेंभुर्णे, डॉ अविनाश शहारे, डॉ वर्षा बारोकर, प्रा प्रमोद नेटी, डॉ. शिल्पा शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुनील घुलक्षे यांनी केले. डॉ अनिल वाळके यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश वाकळे, नरेश मोहुर्ले, वैभव सोनटक्के, संध्या खोडे, मेहंदी हसन, सुदर्शन बांबुर्डे आदींनी परिश्रम घेतले.