
सचिन सापा, मेघ वडजे, रामेश्वर दौड, सिद्धांत जाधव, अतिश राठोडची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत जालना संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर धाराशिव संघावर बाजी मारली. निर्धारित वेळेत जालना व धाराशिव सामना अनिर्णित राहिला. या लढतीत सिद्धांत जाधव हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
बिडकीन येथील क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. धाराशिव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जालना संघाने प्रथम फलंदाजी करत ६६.२ षटकात सर्वबाद ३१४ धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. धाराशिव संघाने पहिल्या डावात ६२.२ षटकात सर्वबाद २९९ धावा काढल्या. जालना संघाला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण १५ धावांची आघाडी मिळाली. जालना संघाने दुसऱ्या डावात १० षटकात एक बाद २६ धावा काढल्या.
या सामन्यात सचिन सापा याने १६६ चेंडूत एक षटकार व सोळा चौकारांसह ९६ धावांची बहारदार खेळी केली. अतिश राठोड याने १२२ चेंडूत ८४ धावा फटकावल्या. त्याने १७ चौकार मारले. मेघ वडजे याने ५६ चेंडूत ७५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने सहा उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. गोलंदाजीत सिद्धांत जाधव याने ७० धावांत सात विकेट घेऊन सामना गाजवला. रामेश्वर दौड याने ७९ धावांत पाच विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्णधार व्यंकटेश काणे याने ४८ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : जालना : पहिला डाव : ६६.२ षटकात सर्वबाद ३१४ (सचिन सापा ९६, प्रज्ज्वल राय १७, आर्यन गोजे १६, वेदांत देव्हाडे २९, मेघ वडजे ७५, अफताफ शेख ४०, सिद्धांत जाधव ७-७०, समर्थ गव्हाणे २-२९) व दुसरा डाव : १० षटकात एक बाद २६ (प्रज्ज्वल राय नाबाद १५, सचिन सापा ५, वेदांत देव्हाडे नाबाद २, अतिश राठोड १-७).
धाराशिव : पहिला डाव : ६२.२ षटकात सर्वबाद २९९ (ध्रुव ठक्कर १८, अतिश राठोड ८४, प्रथमेश पाटील ६१, पृथ्वीराज मिसाळ २२, ओम कामठे १६, साबीर शेख ४१, रामेश्वर दौड ५-७९, ओमकार पातकळ २-४९, व्यंकटेश काणे २-४८, अफताफ शेख १-३६).