
सोफी एक्लेस्टोन विजयाची हिरो
बंगळुरू :टाटा महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिल्या सुपर ओव्हर सामन्यात यूपी वॉरियर्स संघाने गतविजेत्या आरसीबी संघावर रोमहर्षक विजय नोंदवला. सोफी एक्लेस्टोन हिने केवळ चार धावा देत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.
एलिस पेरीच्या (नाबाद ९०) दमदार खेळीवर सोफी एक्लेस्टोन हिची ३३ धावांची खेळी वरचढ ठरली. सोफीच्या स्फोटक खेळीमुळे सामना टाय झाला. शेवटच्या षटकात तिने दोन षटकार ठोकून आरसीबी संघाला विजयापासून दूर ठेवले.
सुपर ओव्हरमध्ये यूपी संघाने प्रथम फलंदाजी करत ८ धावा काढल्या.किम गार्थ हिने प्रभावी गोलंदाजी केली. आरसीबी संघाला ९ धावांची गरज होती. परंतु, स्मृती मानधाना व रिचा घोष या जोडीला केवळ ४ धावा काढण्यात यश आले.
तत्पूर्वी, यूपी वॉरियर्स संघासमोर विजयासाठी १८१ धावांचे आव्हान होते. किरण नवगिरे (२४), वृंदा दिनेश (१४) या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली. परंतु, ही जोडी फटकेबाजीच्या मोहात बाद झाली. दीप्ती शर्मा १३ चेंडूत २५ धावांची खेळी करुन तंबूत परतली. तिने एक षटकार व चार चौकार मारले. ताहलिया मॅकग्रा शून्यावर बाद झाल्याने यूपी संघाला मोठा धक्का बसला. ७२ धावांत यूपी संघाने आघाडीचे चार फलंदाज गमावले होते.
ग्रेस हॅरिस ८ धावांवर बाद झाली. त्यानंतर श्वेता सेहरावत (३१) आणि उमा छेत्री (१४) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघी लागोपाठ बाद झाल्यानंतर यूपी संघ पुन्हा संघर्ष करू लागला. किम गार्थ हिने चिनेल हेन्री (८) हिला क्लीन बोल्ड करून यूपीचा पराभव निश्चित केला. सायमा ठाकोर १४ धावांवर धावबाद झाली. तिने एक षटकार व एक चौकार मारत सामन्यात थोडी रंगत आणली.
त्यानंतर शेवटच्या षटकात सोफी एक्लेस्टोन हिने दोन षटकार व एक चौकार ठोकत संघाला बरोबरी मिळवून दिली. सोफी हिने १९ चेंडूत ३३ धावा फटकावल्या. तिने चार उत्तुंग षटकार ठोकत सामन्यातील रोमांच कायम ठेवला. शेवटच्या चेंडूवर विजयी धाव काढताना सोफी धावबाद झाली. क्रांती गौड २ धावांवर नाबाद राहिली. यूपी संघाने २० षटकात सर्वबाद १८० धावा काढत सामना टाय केला. स्नेह राणा हिने २७ धावांत तीन गडी बाद केले. रेणुका सिंग ठाकूर (२-३६), किम गार्थ (२-४०) यांनी दोन बळी घेतले.
आरसीबी सहा बाद १८०
एलिस पेरीच्या नाबाद ९० धावांच्या मदतीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने (आरसीबी) यूपी वॉरियर्ससमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. यूपी वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून आरसीबी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, परंतु एलिस पेरीने ५७ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ९० धावा केल्या. त्यामुळे आरसीबीला २० षटकांत सहा बाद १८० धावसंख्या उभारता आली. पेरी व्यतिरिक्त डॅनियल व्हाईट हॉगने ४१ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने चांगली सुरुवात केली पण ती पुढे टिकवू शकली नाही. आरसीबीने कर्णधार स्मृती मानधनाची (६) विकेट लवकर गमावली. तथापि, एलिस पेरीने डॅनिएल व्हाईट हॉगसह डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी ९४ धावांची भागीदारी केली. हॉग हिला बाद करून ताहलिया मॅकग्रा हिने ही भागीदारी मोडली. त्यानंतर आरसीबीचा डाव डळमळीत झाला. कारण इतर फलंदाज पेरीला जास्त काळ साथ देऊ शकले नाहीत. रिचा घोष आठ धावा करून बाद झाली, तर कनिका आहुजा पाच धावांवर, जॉर्जिया वेअरहॅम सात धावांवर आणि किम गार्थ दोन धावांवर बाद झाली. यापूर्वी, काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये असलेली मानधना या सामन्यात काही खास कामगिरी करू शकली नाही आणि तिला दीप्ती शर्माने बाद केले. नऊ चेंडूंवर एका चौकाराच्या मदतीने सहा धावा काढल्यानंतर मानधना बाद झाली.
या सामन्यात उत्तर प्रदेशची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकली आणि आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तिचा हा पेरीच्या दमदार फलंदाजीने चुकीचा ठरला. चिनेल हेन्री (१-३४), दीप्ती शर्मा (१-४२), ताहलिया मॅकग्रा (१-३०) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.