
मुंबई : इन्शुरन्स शील्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत बीएआरसी एससीने दमदार कामगिरी करत एमटीएनएल एससीवर ७१ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात सलामीवीर रवी कोळीने ८३ धावांची दिमाखदार खेळी करत बीएआरसीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
क्रॉस मैदानावर झालेल्या या सामन्यात बीएआरसीच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. रवी कोळीच्या ८३ धावांच्या खेळीला कल्पेश केणीच्या ४९ आणि जयचंद्रनच्या ३२ धावांनी चांगली साथ दिली, त्यामुळे संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९१ धावांचा भक्कम स्कोर उभारला.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना एमटीएनएल एससीचा डाव डगमगला. गजानन शिंदे (४६) आणि विशाल देसाई (३९) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. बीएआरसीच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत एमटीएनएलला २० षटकांत ६ बाद १२० धावांवर रोखले. समाधान याने १९ धावांत २ बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली.