
रणजी ट्रॉफी फायनल ः पहिल्या दिवसअखेर विदर्भ चार बाद २५४
नागपूर ः रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात दानिश मालेवारच्या नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भ संघाने पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चार गडी गमावून २५४ धावा केल्या.
विदर्भ आणि केरळ यांच्यातील रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारपासून सुरू झाला. सचिन बेबीच्या नेतृत्वाखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि विदर्भाच्या फलंदाजीला मोठा धक्का दिला.
विदर्भाची सुरुवात खराब झाली.
नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात विदर्भाने धक्कादायक सुरुवात केली. फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलेला पार्थ रेखाडे पहिल्याच षटकात पायचीत बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर, निधेश याने दर्शन नळकांडे याला आपला बळी बनवले. तो फक्त एक धाव करू शकला. संघाला तिसरा धक्का उजव्या हाताचा गोलंदाज एडेन अॅपल टॉमने दिला. त्याने ध्रुव शोरेला मोहम्मद अझरुद्दीनकडून झेलबाद केले. तीन चौकारांच्या मदतीने १६ धावा काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
दानिश मालेवार, करुण नायरची दमदार फलंदाजी
२४ धावसंख्येवर तीन विकेट गमावल्यानंतर दानिश मालेवार आणि करुण नायर ही जोडी विदर्भासाठी तारणहार ठरली. चौथ्या विकेटसाठी दोघांनी २१५ धावांची भागीदारी केली. रोहन कुन्नुमलने करुण नायर याला धावचीत केले. त्याने आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८६ धावा केल्या. दरम्यान, मालेवर १३८ आणि यश ठाकूर पाच धावांवर खेळत आहेत. दरम्यान, केरळकडून मोहम्मद निधीशने दोन आणि एडेन अॅपल टॉमने एक विकेट घेतली.