
पुणे : क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख व गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी कार्य करणाऱ्या चंदू बोर्डे फाउंडेशन या संस्थेतर्फे २०२५ या वर्षासाठीची शिष्यवृत्ती नुकतीच पाच खेळाडूंना प्रदान करण्यात आली.
भारताचे माजी कर्णधार व निवड समिती अध्यक्ष चंदू बोर्डे यांच्या हस्ते व्हॉलीबॉलपटू मृणाल आगरकर, अॅथलिट गौरव भोसले, युवा क्रिकेटपटू गायत्री सुरवसे, अक्षया जाधव आणि रणवीर राजपूत या खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या रोख शिष्यवृत्त्यांचे वाटप करण्यात आले.
भारतीय क्रिकेट संघातून १९५० व १९६० च्या दशकांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्र गाजवणारे पुण्याचे महान क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांना याआधीच पद्मभूषण, पद्मश्री व अर्जुन या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह बीसीसीआयचा सी के नायडू पुरस्कार आणि राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय स्तरांवरील अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. भारतीय संघाचे कर्णधार व अष्टपैलू खेळाडू म्हणून सक्रिय कारकीर्द गाजवल्यानंतर त्यांनी निवड समिती अध्यक्ष व प्रशिक्षक म्हणून प्रशंसनीय कामगिरी बजावली.
निवृत्तीनंतर समाजाच्या आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी हातभार लावण्याकरिता चंदू बोर्डे त्यांचे कुटुंबीय व मित्र मंडळी यांनी चंदू बोर्डे या नोंदणीकृत संस्थेची स्थापना केली. गुणवान खेळाडू तसेच क्रीडा व कला क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या संस्था यांना सहाय्य करणे हे या संस्थेचे गेल्या चार वर्षांपासून लक्ष राहिले आहे. या कालावधीत चंदू बोर्डे फाउंडेशनतर्फे एकूण ४७ पुरुष व महिला खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. यंदाच्या वर्षीही ही परंपरा कायम राखताना पाच खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली असल्याचे चंदू बोर्डे फाउंडेशनचे उदय बोर्डे यांनी सांगितले. या पुरस्कार प्रसंगी चंदू बोर्डे यांच्या पत्नी, मुलगा व सून आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्रसंगी बोलताना चंदू बोर्डे म्हणाले की, हे खेळाडू गुणवान असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला, अशा पुरस्काराचा उपयोग करून घेऊन या खेळाडूंनी नजीकच्या भविष्यात वेगाने प्रगती करावी आणि आश्वासक कामगिरी करावी, अशी आमची अपेक्षा आहे. या सर्व खेळाडूंना चंदू बोर्डे फाउंडेशनच्या वतीने उज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो.