भारतीय सॉफ्ट टेनिस संघात सोनलची निवड

  • By admin
  • February 28, 2025
  • 0
  • 95 Views
Spread the love

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली पहिली खेळाडू

मलकापूर(बुलढाणा) ः पुढील महिन्यात १६ ते २२ मार्च या कालावधीत नोएडा उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या आतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पोर्टस झोन ऑफ मलकापूरची व सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणाची खेळाडू सोनल गणेश खर्चे हिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय संघात निवड होणारी सोनल ही विदर्भातील पहिली खेळाडू ठरली आहे.

सोनल ही तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे असलेल्या सॉफ्ट टेनिस कोर्ट मध्ये नियमित सराव करणारी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने आपल्या राज्याचा व बुलढाणा जिल्हाचा व मलकापूर शहराचा नावलौकिक वाढवला आहे.

यापूर्वी स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरची खेळाडू गौरी मंगलसिंग सोळंके हिने इंग्लंड व न्यूझीलंड व सुचित्रा अजय साखरे हिने थायलंड येथे तलवारबाजी खेळात तर कुणाल वासुदेव बोराडे याने चॉक बॉल खेळात हाँगकाँग येथे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरची सोनल ही चौथी आंतरराष्ट्रीय खेळाडू असून क्रीडा मार्गदर्शक विजय पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मलकापूर शहरातील खेळाडू खेळत आहेत.

सोनल हिने २०२० पासून सॉफ्ट टेनिस या खेळामध्ये सचिव विजय पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत भरारी घेत तालुकास्तरापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. अशी कामगिरी करणारी सोनल ही पहिली खेळाडू ठरली आहे. सोनल हिने आतापर्यंत जवळपास सात राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून अनेक राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला पदक जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत बुलढाणा जिल्हा संघाला कांस्य पदक मिळवून दिले होते. गेल्या दोन वर्षांपासून शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मलकापूर येथे सोनलचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोरगावकर, कार्याध्यक्ष राजेश महाजन, जिल्हा संघटनेचे सचिव विजय पळसकर, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, खजिनदार राजेश्वर खगार, प्रा नितीन भुजबळ, चंद्रकांत साळुंखे, शिवराज जाधव व अतुल जगदाळे आदींनी व सोनलचे अभिनंदन केले असून तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *