
दुबई ः चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर लवकरच भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ आमने-सामने येणार आहेत. आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार असून ही स्पर्धा आगामी सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
आशिया कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. तरीही आशियाई क्रिकेट परिषद ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करू शकते. पीटीआय वृत्तसंथेनुसार आशिया कप सप्टेंबरमध्ये सुरू होऊ शकतो. टी २० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या सूत्रांनी सांगितले की ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होईल. भारताकडे यजमानपदाचे अधिकार आहेत पण ते युएई किंवा श्रीलंकेत खेळवले जाईल. ही स्पर्धा टी २० स्वरूपात खेळवली जाईल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी या फॉरमॅटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादववर असेल.
आठ संघांचा सहभाग
भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी येत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप आयोजित करण्याची तयारी केली आहे. ही स्पर्धा या वर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाऊ शकते, ज्यामध्ये एकूण १९ सामने खेळवले जातील. या स्पर्धेतील मुख्य आकर्षण म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर ते तीनदा एकमेकांसमोर येऊ शकतात. अलिकडेच, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रँड फिनालेमध्ये भारतीय संघाने मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा सहा विकेट्सने पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. २०२५ च्या आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी होतील. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. सर्व संघ दोन गटात विभागले जातील.
भारत या स्पर्धेचा गतविजेता
गेल्या वेळी आशिया कपचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे केले होते. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा १० विकेट्सने पराभव करून भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते. भारत या स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आठ वेळा आशिया कपचे विजेतेपद जिंकले आहे. तर, श्रीलंकेने सहा वेळा आणि पाकिस्तानने दोनदा ही स्पर्धा जिंकली.