
लॅनिंगचे दमदार नाबाद अर्धशतक; मुंबई इंडियन्सचा दुसरा पराभव
बंगळुरू : कर्णधार मेग लॅनिंग (नाबाद ६०), शेफाली वर्मा (४३), जोनासेन (३-२५) व मिन्नू मणी (३-१७) यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा नऊ विकेट राखून पराभव केला. मुंबईचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. या विजयासह दिल्लीचे आठ गुण झाले आहेत. या स्पर्धेत दिल्लीचा हा सलग दुसरा विजय ठरला.
दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी फक्त १२४ धावांचे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार मेग लॅनिंग व शेफाली वर्मा या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. लँनिंग व वर्मा या जोडीने ९.५ षटकात ८५ धावांची भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शेफाली वर्मा ४३ धावांवर बाद झाली. तिने २८ चेंडूंचा सामना करताना तीन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले.

शेफाली बाद झाल्यानंतर लॅनिंग व जेमिमा रॉड्रिग्ज या जोडीने १४.३ षटकात एक बाद १२४ धावा फटकावत संघाला मोठा विजय मिळवून दिला. लॅनिंग हिने ४९ चेंडूत नाबाद ६० धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. तिने नऊ खणखणीत चौकार मारले. जेमिमा हिने १० चेंडूत नाबाद १५ धावा फटकावल्या. तिने दोन चौकार मारले. या जोडीने नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. एकमेव विकेट अमनजोत कौर हिने १२ धावा देऊन घेतला.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी गडगडली
चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तथापि, हरमनप्रीत कौरच्या संघाला संधीचा फायदा घेण्यात अपयश आले आणि त्यांना २० षटकांत नऊ गडी गमावून फक्त १२३ धावाच करता आल्या.
या सामन्यात मुंबईची सुरुवात चांगली झाली. यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली जी शिखा पांडेने मोडली. सारा ब्राइस हिने तिला झेलबाद केले. तिला फक्त ११ धावा करता आल्या. त्यानंतर सदरलँड हिने मॅथ्यूजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ती २२ धावा काढून परतली. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी निराशाजनक फलंदाजी केली. त्यांच्याकडून हरमनप्रीत कौरने २२, अमेलिया करने १७, सजीवन सजना यांनी ५, कमलिनी यांनी १, संस्कृती गुप्ताने ३ आणि अमनजोत कौर हिने नाबाद १७ धावा केल्या. मुंबई संघाकडून एकही फलंदाज दमदार खेळी करू शकला नाही. दिल्लीकडून जेस जोनासन आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी तीन तर शिखा पांडे आणि अॅनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.