शेफाली वर्माची तुफानी फलंदाजी, दिल्ली संघाची विजयाची हॅटट्रिक

  • By admin
  • March 1, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

गतविजेत्या आरसीबी संघाचा नऊ विकेटने पराभव

बंगळुरू : सलग तीन विजयांसह दिल्ली कॅपिटल्स संघाने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत दहा गुणांसह आपले अव्वल स्थान भक्कम केले आहे. शेफाली वर्मा (नाबाद ८०) आणि जेस जोनासेन (नाबाद ६१) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर दिल्ली संघाने गतविजेत्या आरसीबी संघावर नऊ विकेट राखून विजय मिळवला. या स्पर्धेतील दिल्लीचा हा पाचवा विजय आहे. दिल्ली संघाने १५.३ षटकात एक बाद १५१ धावा फटकावत मोठा विजय साकारला.

दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य होते. कर्णधार मेग लॅनिंग (२) लवकर बाद झाली. रेणुका सिंग हिने तिला क्लीन बोल्ड बाद करुन संघाला मोठे यश मिळवून दिले. परंतु, त्यानंतर शेफाली वर्मा आणि जोनासेन या जोडीने धमाकेदार फलंदाजी करत आरसीबी संघाचा पराभव निश्चित केला. शेफाली वर्मा हिने अवघ्या ४३ चेंडूत नाबाद ८० धावांची वादळी खेळी केली. तिने चार उत्तुंग षटकार व आठ चौकार मारले. चौकार ठोकूनच तिने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जेस जोनासेन हिने ३८ चेंडूंचा सामना करत नाबाद ६१ धावांची स्फोटक खेळी केली. तिने एक षटकार व नऊ चौकार मारले. आरसीबी संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात कमकुवत वाटला.

रन मशीन : एलिस पेरी

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकात पाच बाद १४७ धावा केल्या. एलिस पेरी पुन्हा एकदा बंगळुरू संघासाठी तारणहार ठरली पेरी हिने ६० धावांची नाबाद खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले. आरसीबी संघाला सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी आरसीबी संघाला हा सामना जिंकणे खूप आवश्यक होते.

आरसीबी संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. परंतु, कर्णधार स्मृती मानधना पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. तिने फक्त ८ धावा केल्या. दुसरीकडे, डॅनियल वायट हॉज प्रत्येक वेळी चांगली सुरुवात करत आहे पण मोठी खेळी खेळू शकत नाही. तिने २१ धावा केल्या.

एलिसने डाव सावरला
एलिस पेरी आरसीबी संघासाठी रन मशीन राहिली आहे. या हंगामात, तिने महिला प्रीमियर लीग इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज होण्याचा विक्रम केला आहे. तिने ६० धावांची नाबाद खेळी खेळली आणि अडचणीत सापडलेल्या आरसीबीला वाचवले. तिने राघवी बिश्तसोबत मिळून ६६ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पेरीने तिच्या डावात ३ चौकार आणि ३ षटकार मारले. चालू हंगामात आरसीबी संघाला सलग तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दिल्ली कॅपिटल्स सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दिल्लीकडून शिखा पांडे आणि नल्लापुरेड्डी चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. तर मारिजेन कॅप हिने एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *