
३००व्या एकदिवसीय सामन्यात कोहली केवळ ११ धावांवर बाद
दुबई ः चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट फेरीतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात विराट कोहलीचा ग्लेन फिलिप्स याने जादुई झेल घेतला. ग्लेन फिलिप्स याने सूर मारत घेतलेला कोहलीचा झेल चर्चेचा विषय बनला आहे.
विराट कोहलीसाठी हा एक खास सामना होता. कारण विराट कोहलीचा हा ३०० वा एकदिवसीय सामना आहे. तथापि, या विशिष्ट सामन्यात तो मोठी खेळी खेळू शकला नाही. कोहली फक्त ११ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा झेल पॉइंटवर उभे असलेल्या जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या ग्लेन फिलिप्सने घेतला.
भारताला तिसरा धक्का विराट कोहलीच्या रूपात ३० धावांवर बसला. मॅट हेन्रीने टाकलेल्या ७ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, विराट कोहलीने ऑफवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पॉइंटकडे गेला असला तरी, तो तिथे उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्सपासून थोडा दूर होता. पण फिलिप्सने एक शानदार डायव्ह घेतला आणि एका हाताने झेल घेण्यासाठी हवेत उडी मारली.
अनुष्का शर्मा झाली चकीत
ग्लेन फिलिप्सने तो शानदार झेल घेतल्यावर विराट कोहलीलाही आश्चर्य वाटले. स्टँड मध्ये बसलेली त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील निराश झाली. तिने कपाळाला हात लावला, ज्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. विराटचा ३०० वा सामना पाहण्यासाठी अनुष्का दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पोहोचली होती.