
सोलापूर ः शुद्धोहम् ज्वेलर्स व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजीत केलेल्या ‘शुद्धोहम् चषक’ बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीत आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे हिच्यासह आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू श्रेया संदुपटला, सानिध्य जमादार, सान्वी गोरे, वेद आगरकर, हर्ष हलमल्ली, रणवीर पवार, सागर पवार, श्रेयस कुदळे, साईराज घोडके, श्लोक चौधरी या मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत १९, १३ व ९ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापूर शहरासह करमाळा, पंढरपुर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, माढा, माळशिरस आदी गावातील १४५ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ९ वर्षांखालील गटात नियान कंदीकटला, नमन रंगरेज, अर्चित भुतडा, रुद्र प्रतापसिंग चव्हाण तसेच जिल्हा परिषद शाळेतील उदयोन्मुख खेळाडू देखील उत्कृष्ट खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी युवराज कोष्टी व उद्योजिका तथा कोष्टी फर्निचर उद्योग समूहाच्या संचालिका अमोनिका कोष्टी यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाले. अध्यक्षीय मनोगतात पोलिस अधिकारी युवराज कोष्टी यांनी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी हार व जीत यापेक्षा जिद्द व चिकाटी महत्त्वाचे असल्याबाबत सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक अजित दुलंगे, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, जयश्री कोंडा, रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, यश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले.