
न्यूझीलंड संघ फिरकीच्या जाळ्यात अडकला, ४४ धावांनी पराभूत, वरुण चक्रवर्तीचे पाच बळी
दुबई : श्रेयस अय्यर (७९) च्या दमदार फलंदाजीनंतर वरुण चक्रवर्तीच्या (५-४२) फिरकीच्या जाळ्यात न्यूझीलंड संघ सापडला. भारताने ४४ धावांनी सामना जिंकला. या विजयामुळे अ गटात अव्वल स्थानी असलेल्या भारताचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया संघाशी ४ मार्च रोजी सामना होणार आहे.
न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी २५० धावांचे लक्ष्य होते. विल यंग (२२) आणि रचिन रवींद्र (६) यांनी सुरेख सुरुवात केली. परंतु, हे दोघे पाठोपाठ बाद झाले. हार्दिक पंड्याने रचिन रवींद्रची विकेट घेऊन त्यांना पहिला धक्का दिला. वरुण चक्रवर्ती याने या स्पर्धेतील पहिला सामना खेळताना विल यंगला २२ धावांवर बाद करुन दुसरा धक्का दिला.

अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकी चौकडीने न्यूझीलंड संघाला आक्रमक खेळण्यापासून रोखले. त्यामुळे धावगती मंदावली. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होत गेले. डॅरिल मिशेल याला १७ धावांवर कुलदीप यादवने पायजीत बाद केले. त्यानंतर टॉम लॅथम (१४) रवींद्र जडेजाविरुद्ध पायचीत बाद झाला. वरुण चक्रवर्ती याने ग्लेन फिलिप्स (१२) व मायकेल ब्रेसवेल (२) यांना पायचीत बाद करुन न्यूझीलंड संघाला बॅकफूटवर ढकलले. दोन बाद ९२ अशा भक्कम स्थितीत असलेला न्यूझीलंड संघ सहा बाद १५९ धावसंख्या अशा बिकट स्थितीत पोहोचला.
एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना अनुभवी फलंदाज केन विल्यमसन याने फिरकी गोलंदाजांचा भक्कमपणे सामना करत अर्धशतक ठोकले. विल्यमसनच्या दमदार खेळीमुळे न्यूझीलंड संघ झुंज देत होता. परंतु, ४१व्या षटकात अक्षर पटेल याने विल्यमसन याला चकवले आणि राहुलने त्याला यष्टीचीत बाद करुन मोठा अडसर दूर केला. विल्यमसन याने १२० चेंडूत ८१ धावांची अप्रतिम खेळी साकारली. त्याने सात चौकार मारले. तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा अंधूक बनल्या.

वरुण चक्रवर्ती याने कर्णधार सँटेरनला २८ धावावर बाद करुन संघाचा विजय निश्चित केला. त्याने दोन षटकार व एक चौकार मारला. चक्रवर्ती याने मॅट हेन्री याला बाद करत सामन्यातील पाचवा बळी मिळवला. कुलदीप यादवने विल्यम ओरोर्के याला क्लीन बोल्ड करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडचा डाव ४५.३ षटकात २०५ धावांवर संपुष्टात आला. भारताने हा सामना ४४ धावांनी जिंकला. आता भारताचा सामना उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया संघाशी ४ मार्च रोजी होणार आहे.
वरुण चक्रवर्ती याने या स्पर्धेतील पहिला सामना खेळताना ४२ धावांत पाच विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणून सोडले आहे. कुलदीप यादव (२-५६), हार्दिक पंड्या (१-२२), अक्षर पटेल (१-३२), रवींद्र जडेजा (१-३६) यांनी विकेट घेत संघाला विजय निश्चित केला.
भारताची फलंदाजी गडगडली
तत्पूर्वी, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत भारतीय संघाने दोन्ही सामन्यांत धावांचा पाठलाग करुन विजय नोंदवले होते. या लढतीत भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. भारतीय संघाने ५० षटकात नऊ बाद २४९ धावसंख्या उभारली.
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. उपकर्णधार शुभमन गिल २ धावांवर पायचीत बाद झाला. रोहित शर्मा याने १७ चेंडूत १५ धावा फटकावल्या. रोहितने एक षटकार व एक चौकार मारला. रोहित मोठी खेळी करेल असे वाटत असताना रोहित एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात १५ धावांवर बाद झाला. जेमीसन याने रोहितची विकेट घेऊन भारताला मोठा धक्का दिला.
३०० वा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पाकिस्तान संघाविरुद्ध विराटने दमदार शतक ठोकले होते. त्यामुळे कोहली या सामन्यात किती धावा काढतो याकडे चाहत्यांचे लक्ष होते. परंतु, विराट कोहली १४ चेंडूत ११ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याने दोन चौकार मारले. पॉइंटवर उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्स याने कोहलीचा जोरदार फटका एका हातात पकडून त्याला तंबूत पाठवले. फिलिप्स याने जबरदस्त झेल घेतला. त्याने ज्या प्रकारे झेल टिपला त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. स्वत: कोहली देखील चकीत झाला होता.
कोहली बाद झाला तेव्हा भारताची स्थिती ६.३ षटकात तीन बाद ३० अशी बिकट झाली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या जोडीने चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. अक्षर पटेल याने ६१ चेंडूत ४२ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले. त्यानंतर श्रेयस अय्यर व केएल राहुल यांच्यात ४४ धावांची भागीदारी झाली. राहुल २९ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ श्रेयस अय्यर सर्वाधिक ७९ धावांची खेळी करुन बाद झाला. अय्यर याने ९८ चेंडूत चार चौकार व दोन षटकार मारले. अय्यर याने फिरकी व वेगवान गोलंदाजांचा सुरेख सामना करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला.
अष्टपैलू हार्दिक पंड्या याने ४५ चेंडूत ४५ धावांची वेगवान खेळी केली. त्याने दोन उत्तुंग षटकार व चार चौकार ठोकले. रवींद्र जडेजा याने १६ धावांचे योगदान दिले. शमी ५ धावांवर बाद झाला. कुलदीप यादव (१) नाबाद राहिला.
न्यूझीलंड संघाकडून मॅट हेन्री याने ४२ धावांत पाच विकेट घेऊन भारताला २४९ धावांवर रोखले. हेन्रीच्या प्रभावी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज गडगडले. जेमीसन (१-३१), विल्यम ओरोर्के (१-४७), सँटनर (१-४१) व रचिन रवींद्र (१-३१) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.