
दुबई ः वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला वगळून फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याला खेळवण्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. वरुण चक्रवर्ती याने पाच विकेट घेऊन न्यूझीलंड संघाला धोबीपछाड केली.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी या सामन्यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली होती. फक्त उपांत्य फेरीत कोणत्या संघाशी सामना करावयाचा आहे यासाठी हा सामना महत्त्वाचा होता. त्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा ४४ धावांनी पराभव केला. या स्पर्धेत भारतीय संघाने गटातील तीनही सामने जिंकले आहेत. अशी कामगिरी करणारा भारतीय संघ या स्पर्धेतील एकमेव संघ ठरला आहे.
रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांना सामन्यापूर्वीच माहित होते की दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरतील. अशा परिस्थितीत त्यांनी हर्षित राणाला संघा बाहेर ठेवून वरुण चक्रवर्तीला संघात समाविष्ट केले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. वरुण चक्रवर्ती याने रोहित शर्मा आणि गौतम गंभीरच्या अपेक्षांवर खरा उतरला आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याने ५ विकेट्स घेतल्या.
वरुण चक्रवर्तीच्या फिरकी गोलंदाजीला न्यूझीलंडच्या फलंदाजांकडे प्रभावी उत्तर नव्हते. रवींद्र जडेजा (२०१३) आणि मोहम्मद शमी (२०२५) नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाच विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज आहे. या सामन्यात कुलदीप यादव याने दोन तर हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताकडून वरुण चक्रवर्तीने १० षटकांत ४२ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवला दोन यश मिळाले. नऊ विकेटच्या मोबदल्यात २४९ धावा केल्यानंतर, भारताने न्यूझीलंडला २०५ धावांवर गुंडाळले.