
पुणे ः विश्व विजय बुद्धिबळ अकादमीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च रोजी एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शांताबाई पंडितराव कुलकर्णी स्मरणार्थ एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा फक्त महिलांसाठी आहे. ही स्पर्धा १०,१ ४, १७ अशा वयोगट आणि ओपन गट अशा विविध गटात घेण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक मिलिंद नाईक यांनी दिली.
पुणे जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने घेण्यात येत असलेली ही बुद्धिबळ स्पर्धा यूरो स्कूल, भूमकर चौक, पुणे-मुंबई महामार्गाजवळ, वाकड या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ४०० रुपये ठेवण्यात आले आहे. विजेत्यांसाठी एकूण ५० हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच २० ट्रॉफी व ४० मेडल्स विजेत्यांना देण्यात येणार असल्याचे संयोजक मिलिंद नाईक यांनी सांगितले.
ही बुद्धिबळ स्पर्धा अंडर ८, अंडर १०, अंडर १२, अंडर १४, अंडर १७ आणि ओपन अशा गटात घेण्यात येणार आहे. तसेच १४०१ ते १६०० रेटिंग गट, व्हीव्हीसीए गट, सीनियर सिटीझन अशा गटातही ही स्पर्धा होईल. सर्व गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. अंडर ८ ते अंडर १७ या गटात पाच ते दहा क्रमांकाच्या खेळाडूंना मेडल्स दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ९९७०१८७४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक मिलिंद नाईक यांनी केले आहे.