
एमसीए वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धा
सांगली : जयसिंगपूर येथे सुरू झालेल्या आंतर जिल्हा महिलांच्या वरिष्ठ गटाच्या एकदिवसीय मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूर महिला संघाने परभणी महिला संघावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळविला. सोलापूर संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या त्या साक्षी वाघमोडे, पूनम माशाळे, विभावरी देवकते.
नाणेफेक जिंकून परभणी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु ऋतुजा गिलबिले (६१) वगळता इतर कोणत्याही खेळाडूला सोलापूरच्या पूनम माशाळे (३-३३), विभावरी देवकते (३-२५) यांनी टिकाव धरू दिला नाही. भक्ती पवार, साक्षी लामकाने, स्नेहा शिंदे, साक्षी वाघमोडे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. सान्वी म्हात्रे नाबाद २१ आणि अवांतर २१ धावा देत परभणी संघाचा डाव ४६.१ षटकात १७८ धावांत गुंडाळला.
विजयी लक्ष्य गाठताना सोलापूरच्या साक्षी वाघमोडे हिने सलामीला येत ८७ धावांची स्फोटक खेळी केली. साक्षी हिने ९० चेंडूंचा सामना करताना १३ चौकार मारले. तिच्या सोबत स्नेहा शिंदे हिने ३८ धावांची उपयुक्त खेळी केली. सोलापूर संघाने ३५.३ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावा करत सात विकेटने सामना जिंकला. परभणी संघाकडून सान्वी म्हात्रे (२-४१) व अनन्या दर्शाळे हिने १ बळी घेतला. साक्षी वाघमोडे हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सोलापूर संघाने दणदणीत विजय प्राप्त केला.