
नवी दिल्ली ः भारताचा महान टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने बुधवारी जाहीर केले की या महिन्याच्या अखेरीस चेन्नई येथे होणारी डब्ल्यूटीटी कंटेंडर स्पर्धा ही त्याची व्यावसायिक खेळाडू म्हणून शेवटची स्पर्धा असेल. जागतिक टेबल टेनिस स्पर्धा २५ ते ३० मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे.
४२ वर्षीय शरथ कमल म्हणाला की, ‘मी माझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा चेन्नईमध्ये खेळलो आणि माझी शेवटची स्पर्धा देखील चेन्नईमध्ये खेळेन. व्यावसायिक खेळाडू म्हणून ही माझी शेवटची स्पर्धा असेल. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये पाचवे आणि शेवटचे ऑलिम्पिक खेळणारा अनुभवी खेळाडू शरथ कमल म्हणाला की, ‘मी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकली आहेत. मी ऑलिम्पिक पदक जिंकू शकलो नाही. आशा आहे की येणाऱ्या तरुण प्रतिभांच्या माध्यमातून मी माझे स्वप्न पूर्ण करू शकेन.’
राष्ट्रकुल स्पर्धेत अनेक पदके जिंकली
२०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये १६ वर्षांनी शरथ कमल याने पुरुष एकेरी टेबल टेनिस मध्ये सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी त्याने २००६ मध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शरथचे हे एकूण सातवे सुवर्णपदक होते. बर्मिंगहॅममधील तीन सुवर्णपदकांव्यतिरिक्त, शरथने २००६ मध्ये पुरुष एकेरी आणि पुरुष सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक, २०१० मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक आणि २०१८ मध्ये पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, त्याने २०१० मध्ये दोन कांस्यपदके, २०१४ आणि २०१८ मध्ये प्रत्येकी एक रौप्य आणि २०२२ मध्ये एक रौप्यपदक जिंकले आहे. शरथने राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण १३ पदके जिंकली आहेत.
भारताचा तिसरा सर्वात यशस्वी खेळाडू
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये शरथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापेक्षा जास्त पदके फक्त जसपाल राणा (शूटिंग) आणि समरेश जंग (शूटिंग) यांनी जिंकली आहेत. जसपालने राष्ट्रकुल स्पर्धेत १५ पदके (९ सुवर्ण) जिंकली आहेत आणि समरेशने १४ पदके (७ सुवर्ण) जिंकली आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांव्यतिरिक्त, शरथने आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत. २०१८ च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत शरथ कमलने पुरुषांच्या सांघिक आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले. याशिवाय, त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके जिंकली आहेत. २०२१ च्या दोहा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.