
रिद्धी नाईक, सई भोयरची दमदार शतके
नागपूर ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ महिला संघाने मणिपूर महिला संघावर २२३ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. रिद्धी नाईक (११७), सई भोयर (नाबाद १२२), आयुषी ठाकरे (४-८) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर विदर्भ संघाने मोठा विजय नोंदवला.

विदर्भ महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात पाच बाद ३०६ असा धावांचा डोंगर उभारला. रिद्धी नाईक (११७) व सई भोयर (नाबाद १२२) यांनी शानदार शतके ठोकून संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. नाईक व भोयर या जोडीने चौथ्या विकेटसाटी १९७ धावांची भागीदारी करत सामना एकतर्फी बनवला.
तीन बाद ४१ अशा स्थितीत विदर्भ महिला संघ असताना रिद्धी नाईक व सई भोयर या जोडीने मणिपूर गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत शतके झळकावली. रिद्धी नाईक हिने १२८ चेंडूत १६ चौकार व एक षटकार ठोकत शतक साजरे केले. सई भोयर हिने १०३ चेंडूंचा सामना करत नाबाद १२२ धावा फटकावल्या. सई हिने १३ चौकार व दोन षटकार मारले. ४४व्या षटकात रिद्धी बाद झाल्यानंतर सई भोयर व मानसी पांडे (३०) यांनी ३६ चेंडूत ६२ धावा फटकावत विदर्भ संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.

धावांचा डोंगर उभारल्यानंतर विदर्भ महिला संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत मणिपूर संघाची दाणादाण उडवून दिली. ३५.३ षटकात मणिपूरचा डाव ८३ धावांत आटोपला. विदर्भ संघाने तब्बल २२३ धावांनी सामना जिंकला. आयुषी ठाकरे हिने ८ धावांत चार विकेट घेत मणिपूरचा डाव उध्वस्त केला. तिला मानसी पांडे (२-५) आणि वेदांती सालोदकर (२-१२) यांनी सुरेख साथ दिली. आता विदर्भ महिला संघाचा सामना तामिळनाडू संघाशी शुक्रवारी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः विदर्भ महिला संघ ः ५० षटकात पाच बाद ३०६ (रिद्धी नाईक ११७, सई भोयर नाबाद १२२, मानसी पांडे ३०) विजयी विरुद्ध मणिपूर महिला संघ ः ३५.३ षटकात सर्वबाद ८३ (आयुषी ठाकरे ४-८, मानसी पांडे २-५, वेदांती सालोदकर २-१२).