धाराशिवच्या छत्रपती मंडळ संघाला विजेतेपद 

  • By admin
  • March 6, 2025
  • 0
  • 55 Views
Spread the love

सोलापूरचा किरण स्पोर्ट्स संघ उपविजेता 

बार्शी ः सोलापूरच्या किरण स्पोर्ट्स संघाला १६-१४ असे २ गुण व सात मिनिटे राखून नमवत धाराशिव येथील छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने कर्मवीर चषक विभागीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या कर्मवीर मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात धारशिव संघाने हाफ टाइमला १३-८ अशी निर्णायक आघाडी घेतली होती. अनिकेत पवार, रोहित चव्हाण, विजय शिंदे व रोहन गुंड हे धाराशिव संघाच्या विजयाचे मानकरी ठरले. अनिकेत व रोहित यांनी अष्टपैलू आणि विजयने संरक्षणाची व तर रोहनने आक्रमणाची बाजू सांभाळली. किरण स्पोर्ट्स संघाच्या अक्षय इंगळे व निरज कोळी यांचे प्रयत्न अपुरे पडले.

तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात हाफ टाइमपर्यंत ९-९ अशी बरोबरी असलेल्या धाराशिव येथील श्री तुळजाभवानी क्रीडा मंडळाने वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळास २२-१७ असे ७ गुणांनी नमविले. या सामन्यात हरद्या वसावे याने १.२०,१.१० मिनिटे संरक्षण करीन ४ गडी टिपले. राज जाधव याने याने आक्रमणात ५ गडी टिपले. वेळापूरकडून गणेश बोरकर व कृष्णा बसनोडे यांची लढत अपुरी पडली.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे संस्थापक व संवर्धक कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीने महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सातारा, सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातील आठ संघ सहभागी झाले होते. 

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ चंद्रजीत जाधव, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ प्रकाश बुरगुटे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, सहसचिव ए पी देबडवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, खजिनदार जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ एस एस गोरे, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अजितकुमार संगवे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, भारतीय खो-खोपटू रामजी कश्यप, प्रदीप लोंढे, स्मिता बुरगुटे, अमृत राऊत, स्पर्धा निरीक्षक प्रवीण बागल, राजाभाऊ शिंदे, माजी प्राचार्य डॉ सी एस मोरे, व्ही एस पाटील, डॉ दिलीप मोहिते, डॉ एस एम लांडगे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शरद सावळे यांनी करून दिला. स्पर्धा सचिव डॉ एस एस मारकड यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्मिता सुरवसे व प्रा पी पी नरळे यांनी केले.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

अष्टपैलू ः रोहित चव्हाण (धाराशिव)

संरक्षक ः विजय शिंदे (धाराशिव)

आक्रमक ः अक्षय इंगळे (सोलापूर)

अंतिम निकाल 

१. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ धाराशिव, २. किरण स्पोर्ट्स क्लब सोलापूर, ३. श्री तुळजाभवानी क्रीडा मंडळ धाराशिव, ४. अर्धनारी  नटेश्वर क्रीडा मंडळ, वेळापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *