
महिलांना २० टक्के सवलत देण्याचा महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर ः जागतिक महिला दिनानिमित्त फक्त महिलांसाठी सात दिवसांचे मोफत जलतरण साक्षरता व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर आठ मार्च रोजी सुरू होणार आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगर पालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलावावर सात दिवसाचे मोफत जलतरण साक्षरता व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनापासून केले जाणार आहे. तसेच पुढे नियमित रितसर प्रवेश घेणाऱ्या महिलांना फी मध्ये २० टक्के सुट देण्याची घोषणा महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली आहे.
तसेच या ऐतिहासिक निर्णयात छत्रपती संभाजीनगरचे इतर जलतरण तलाव मालक सुद्धा सहभागी झाले आहेत. मिरा प्रभाकर पांडे आणि एमपीपी क्रीडा संकुलाचे प्रमुख ॲड गोपाल पांडे व गणू पांडे यांनी त्यांच्या जलतरण तलावावर येणाऱ्या महिलांसाठी दर महिन्याला चार दिवस अतिरिक्त पोहण्याची सवलत देऊन महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे असे सांगितले. तसेच हर्सुल परिसरात स्माईल स्विमिंग पूलचे संचालक गजानन टेहरे यांनी सुद्धा महिलांसाठी अतिरिक्त चार दिवसांची सवलत देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
जल हे जीवन आहे ते मृत्यूचे कारण ठरू नये म्हणून प्रत्येकाला जलतरणाची माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण व प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने प्रेरित राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन २०२५ कार्यरत आहे. आवाज दो हे या वर्षीचे घोषवाक्य आहे. आवाज दो म्हणजे प्रत्येकाला जलतरणाबद्दल जागृत करणे, माहिती देणे, त्यांना जलतरणाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रेरित करणे हा आहे. महिलांमध्ये अजून सुद्धा जलतरणाबद्दल पाहिजे त्या प्रमाणात जागृती झालेली नाही असे संयोजक राजेश भोसले यांनी सांगितले.
जलतरण हे महिलांसाठी किती उपयुक्त आहे याची देखील पुरेशी माहिती महिलांना नाही. सामाजिक दृष्टीकोण सुद्धा कारणीभूत आहे तो बदलने, स्वतः पुढे येवून जलतरण शिकणे, स्वतः पोहणे शिकणे व आपल्या कुटुंबाला सुद्धा जलतरण शिकण्यासाठी प्रेरीत करणे अपेक्षीत आहे. जेणे करून महिलांमध्ये जलतरणाची आवड निर्माण होईल असे राजेश भोसले यांनी सांगितले.
जलतरण क्रीडा प्रकारामध्ये महिलांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबातील महिला जलतरण साक्षर व्हावी जेणे करून ते संपूर्ण कुटूंब जलतरण साक्षर होण्यास मदत होईल. पोहता आले पाहिजे म्हणजे आपत्ती प्रसंगी किमान स्वतःचा जीव वाचवता येईल. या उपक्रमात जास्तीत महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन जागतिक जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे जलतरणपटू आणि प्रशिक्षक राजेश भोसले यांनी केले आहे.
तसेच अधिक संपर्कासाठी अंजूषा मगर (7776844398), वंदना वाघमोडे (95276 44192), पौर्णिमा भोसले (9699944712) यांच्याशी करावा. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीता गंगावणे, डॉ नुतन गुट्टे, सोनाली भिसे आदी परिश्रम घेत आहेत.