
मीना गुरवे, रुशिता जंजाळ, जितेश्री दमालेची चमकदार कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत जालना महिला संघाने लातूर महिला संघावर ४२ धावांनी विजय नोंदवत आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात मीना गुरवे, जितेश्री दमाले, रुशिता जंजाळ यांची कामगिरी शानदार राहिली. मीना गुरवे हिने सामनावीर किताब संपादन केला.

पुणे येथे झालेल्या या सामन्यात लातूर महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय अचूक ठरला. जालना महिला संघ २२.१ षटकात १११ धावांवर सर्वबाद झाला. परंतु, जालना महिला संघातील गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत लातूर महिला संघाचा डाव २१.५ षटकात अवघ्या ६९ धावांवर रोखत ४२ धावांनी सामना जिंकला हे विशेष. या संघाला जालना जिल्हा क्रिकेट संघटनेचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या सामन्यात अरुषी गलांडे हिने ४८ चेंडूत ४१ धावा काढल्या. तिने आठ चौकार मारले. मीना गुरवे हिने २० चेंडूत चार चौकारांसह २६ धावांची वेगवान खेळी केली. प्रांजल पवार हिने २५ धावा फटकावताना एक षटकार व तीन चौकार मारले. गोलंदाजीत भक्ती पाटील, जितेश्री दमाले, रुशिता जंजाळ यांची कामगिरी प्रभावी ठरली. भक्ती पाटील हिने ११ धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. जितेश्री दमाले हिने १९ धावांत चार विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रुशिता जंजाळ हिने ८ धावांत तीन विकेट घेत चमकदार कामगिरी बजावली.

संक्षिप्त धावफलक ः जालना महिला संघ ः २२.१ षटकात सर्वबाद १११ (अरुषी गलांडे ४१, मीना गुरवे २६, सिद्धी लोणकर १५, जितेश्री दमाले ६, भक्ती पाटील ४-११, ऐश्वर्या रेड्डी २-३२, प्रांजल पवार २-२०, मोहिनी खडप १-३४) पराभूत विरुद्ध जालना महिला संघ ः २१.५ षटकात सर्वबाद ६९ (गार्गी जुवेकर १०, श्वेता नारतवडेकर १३, प्रांजल पवार नाबाद २५, भक्ती पाटील ६, जितेश्री दमाले ४-१९, रुशिता जंजाळ ३-८, मीना गुरवे ३-३२). सामनावीर ः मीना गुरवे.