
११ वर्षीय स्वरा गाडेचे धमाकेदार शतक
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला निमंत्रित एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विलास महिला संघाने स्टार महिला संघाचा २१० धावांनी पराभव केला. ११ वर्षीय शतकवीर स्वरा गाडे (गुरव) हिने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
किंग्ज धानोरी मैदानावर हा सामना झाला. विलास महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विलास महिला संघाने ५० षटकात पाच बाद ३३४ असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. ३३५ धावांचे विजयी लक्ष्य असताना स्टार महिला संघ ४३.४ षटकात अवघ्या १२४ धावांत सर्वबाद झाला. विलास महिला संघाने २१० धावांनी सामना जिंकत आगेकूच केली.
या सामन्यात विलास संघाच्या स्वरा गाडे (गुरव) हिने शानदार शतक झळकावले. स्वरा हिने १२१ चेंडूंचा सामना करत १०४ धावा फटकावल्या. त्यात तिने ११ चौकार मारले. स्वरा ही अवघ्या ११ वर्षांची असून तिने सीनियर महिला क्रिकेट स्पर्धेत शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वराला क्रिकेट प्रशिक्षक नितीन सांबल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
श्रावणी रावल हिने ६० चेंडूत ७५ धावांची आक्रमक खेळी केली. तिने दोन उत्तुंग षटकार व आठ चौकार मारले. श्रुतिका पाटील हिने ६८ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. तिने आठ चौकार मारले. गोलंदाजीत तनिष्का गुर्राम हिने १५ धावांत तीन विकेट घेतल्या. साक्षी पाटील हिने ३८ धावांत तीन बळी घेतले. गार्गी वाघ हिने १४ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः विलास महिला संघ ः ५० षटकात पाच बाद ३३४ (स्वरा गाडे १०४, प्रियल शिनगारे १०४, श्रुतिका पाटील ६४, श्रावणी रावल नाबाद ७५, राजलक्ष्मी निकम नाबाद १३, इतर ३७, साक्षी पाटील ३-३८, प्रिया कोकरे १-५३, तन्वी खलाडकर १-४८) विजयी विरुद्ध स्टार महिला संघ ः ४३.४ षटकात सर्वबाद १२४ (मयुरी पंचावरे ३९, प्रिया कोकरे १७, साक्षी पाटील ९, तन्वी खलाडकर १४, माधवी पंचावरे १३, मोक्ष चौधरी नाबाद ८, इथर १७, तनिष्का गुर्राम ३-१५, गार्गी वाघ २-१४, राजलक्ष्मी निकम १-२७, स्वरा गाडे १-२०, जानवी गोडसे १-१९, समृद्धी चाट्टे १-१७). सामनावीर ः स्वरा गाडे (गुरव).