
पुणे ः ड्रीम फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या कुस्तीगीरांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या कुस्तीगीराने आंतरराष्ट्रीय पातळीवर, आशियाई व ऑलिम्पिकमध्ये सुवर्णमय कामगिरी करावी म्हणून ड्रीम फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक दिवसांपासून कार्यरत आहोत. ड्रीम फाऊंडेशन मिशन ऑलिम्पिक या योजनेच्या माध्यमातून जाणता राजा कुस्ती केंद्रामध्ये सध्या १० कुस्तीगीरांचा खर्च करण्यात येत आहे असे संदीप भोंडवे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात अजून अनेक गरजू व जातिवंत कुस्तीगीर आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन ड्रीम फाऊंडेशनने १५, १७ व २० वर्षांखालील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या २० कुस्तीगीरांना प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये रुपये खर्चाकरीता देण्याचा निर्णय घेतला आहे. या करीता साई केंद्रातील कुस्तीगीर वगळून आम्ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या ३३ कुस्तीगीरांची यादी प्रसिद्ध करत आहोत. त्यामधील २० कुस्तीगीरांना एप्रिल ते मार्च २०२६ या एक वर्षासाठी महिना प्रत्येकी ५ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचे निश्चित केले आहे.
यादीतील ३३ कुस्तीगीरांपैकी ज्या कुस्तीगीरांना महिना ५ हजार रुपये आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे अशा कुस्तीगीरांनी ९९२१६६५५५५ या मोबाईल नंबरवर स्वतःची कुस्ती खेळातील कामगिरी व आधार कार्ड पाठवावे असे आवाहन संदीप भोंडवे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात फक्त २० नाही तर अनेक प्रतिभावंत गरजू कुस्तीगीर आहेत तसेच ५ हजार रुपये ही रक्कम तुटपुंजी आर्थिक मदत आहे. परंतु आम्ही शक्य तेवढे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असे संदीप भोंडवे यांनी सांगितले.