
छत्रपती संभाजीनगर ः आंतररराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या तेजस पाटील याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
इजिप्त देशातील कैरो शहरात सीनियर एफआयई फॉइल वर्ल्ड कप तलवारबाजी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी संघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस पाटील याची भारतीय तलवारबाजी संघात निवड करण्यात आली आहे. मागील वर्षी पार पडलेल्या ज्युनियर, सीनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील, साईचे उप संचालक डॉ मोनिका घुगे, सहसंचालक सुमेध तरोडेकर, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, एस पी जवळकर, गोकुळ तांदळे, डॉ दिनेश वंजारे, तुकाराम मैत्रे आदींनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.