
रविवारी व सोमवारी होणार कार्यशाळा
सोलापूर ः भारताच्या ज्युनिअर टेबल टेनिस संघाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जगदीप भिवंडीकर यांची कार्यशाळा इंदिरा गांधी स्टेडियमवरील मुळे पॅव्हेलियन हॉल येथे ९ व १० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.
जगदीश भिवंडीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला ९ सुवर्ण, १३ रौप्य आणि २५ कांस्य पदके मिळवून दिली आहेत. टेबल टेनिस खेळाडूंनी कठीण परिस्थितीत तसेच तणावपूर्ण प्रसंगात आपला खेळ कसा उंचवावा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत केवळ खेळाडूंचेच नव्हे तर त्यांच्या पालकांचे देखील समुपदेशन करण्यात येणार असून खेळाडूंनाही त्यांचे खेळातील कौशल्य कसे विकसित करायचे आणि आपला सर्वोत्तम खेळ करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके कशी मिळवावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
भारतीय टेबल टेनिसच्या इतिहासात पहिल्यांदाच जगदीश भिवंडीकर एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन आले असून याच कार्यक्रमातून भारताला भविष्यात पदके मिळवून देऊ शकतील अशा महाराष्ट्रातील वंचित आणि पॅरा खेळाडूंसह गुणवान खेळाडूंचाही शोध घेण्यात येणार आहे. यासाठी मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विभागात हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून यातून गुणवान मुलांची निवड करून त्यांना एक वर्षासाठी भिवंडीकर यांचे मार्गदर्शन आणि मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राष्ट्रकुल महासंघाच्या पॅरा (लेव्हल वन) प्रशिक्षक असणारे जगदीप भिवंडीकर हे भारतातील पहिले आणि एकमेव प्रशिक्षक आहेत ज्यांची भारतीय टेबल टेनिस महासंघ आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने त्यांना पॅरा मेंटॉरशिप प्रोग्रॅम साठी नामनिर्देशित केले आहे.
जगदीश भिवंडीकर हे सध्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या पॅरा कमिटीचे चेअरमन देखील असून गुड डीड वेल्फेअर फाऊंडेशन आणि आरएनएफ वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी भिवंडीकर यांच्याशी ९८२१२०७००७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.