
महाराष्ट्र महिला संघाचा दिल्ली संघावर ९ धावांनी रोमांचक विजय
चंदीगड : ईश्वरी अवसरे (१२६), खुशी मुल्ला (११६) आणि उत्कर्षा कदम (४-५५) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र महिला संघाने बीसीसीआय अंडर २३ महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत दिल्ली महिला संघाचा रोमांचक सामन्यात नऊ धावांनी पराभव केला.
महाजन क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात आठ बाद ३१४ असा धावांचा डोंगर उभारला. दिल्ली संघाने या धावसंख्येचा पाठलाग करताना ५० षटकात सात बाद ३०५ धावा फटकावत सामना रोमहर्षक बनवला. परंतु, महाराष्ट्र महिला संघाने ९ धावांनी रोमांचक विजय साकारत आगेकूच कायम ठेवली.

महाराष्ट्र महिला संघाच्या ईश्वरी अवसरे व खुशी मुल्ला या सलामी जोडीने संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. ईश्वरी व खुशी या जोडीने ३२.५ षटकात २३५ धावांची भागीदारी करुन संघाची स्थिती भक्कम केली. द्विशतकी भागीदारी करताना ईश्वरी अवसरे व खुशी मुल्ला यांनी शानदार शतके झळकावली. ईश्वरीने ९६ चेंडूंचा सामना करत १२६ धावांची वेगवान शतकी खेळी केली. तिने सहा उत्तुंग षटकार व ११ चौकार मारले. खुशी मुल्ला हिने १२२ चेंडूंत ११६ धावांची वेगवान खेळी केली. तिेन १६ चौकार मारले.
तनिषा सिंग हिने ईश्वरीला बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आयशा शेख (०), ईश्वरी सावकार (२३), श्रद्धा गिरमे (४), ज्ञानेश्वरी पाटील (७), पठारे ९३), उत्कर्षा कदम (५) या ठराविक अंतराने बाद झाल्या. भाविका अहिरे हिने दोन चौकारांसहक नाबाद २० धावा काढल्या. महाराष्ट्र महिला संघाने ५० षटकात आठ बाद ३१४ अशी भक्कम धावसंख्या उभारली.
दिल्ली महिला संघाकडून सुमिती सोनी हिने ६२ धावांत तीन विकेट घेतल्या. मधु (२-६७), तनिषा सिंग (२-५०) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारती रावल (१-४०) हिने एक बळी मिळवला.

दिल्ली महिला संघासमोर विजयासाठी ३१५ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली संघ ५० षटकात सात बाद ३०५ धावा काढू शकला. उपासना यादव हिने सर्वाधिक ८८ धावा फटकावल्या. तिने ९० चेंडूत ११ चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर तनिषा सिंग हिने ७७ चेंडूत ७९ धावांची आक्रमक खेळी केली. तिने आठ चौकार मारले. प्रज्ञा रावत हिने ६० चेंडूत ४१ धावा काढल्या. तिने सात चौकार मारले. दीक्षा हिने ४६ चेंडूत नाबाद ५६ धावा फटकावल्या. तिने दोन षटकार व पाच चौकार मारले.
आघाडीच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. परंतु, अन्य फलंदाज एका बाजूने बाद होत गेले. त्याचा फटका दिल्ली संघाला बसला. महाराष्ट्र संघाच्या उत्कर्षा कदम हिने ५५ धावांत चार विकेट घेत संघाला रोमांचक विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. खुशी मुल्ला हिने ५३ धावांत दोन विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी नोंदवली. पठारे हिने ६३ धावांत एक बळी घेतला.