मुंबई इंडियन्स संघाचा गुजरात संघावर दमदार विजय 

  • By admin
  • March 10, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

हरमनप्रीत कौरचे आक्रमक अर्धशतक, भारती फुलमाळीची तुफानी फलंदाजी 

मुंबई : कर्णधार हरमनप्रीत कौर (५४), शबनीम इस्माईल (२-१७) व अमेलिया केर (३-३४) यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने गुजरात जायंट्स संघाचा ९ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई संघाने १० गुणांची कमाई करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. मुंबईचा एक सामना बाकी असल्याने त्यांना अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. 

गुजरात जायंट्स संघासमोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा  पाठलाग करताना गुजरात संघ भारती फुलमाळी हिने एकाकी झुंज देत २५ चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली. भारतीच्या खेळीमुळे सामना थोडा रंजक ठरला. भारतीने चार उत्तुंग षटकार व आठ चौकार मारले. हरलीन देओल (२४), फोबी लिचफिल्ड (२२) यांनी थोडा प्रतिकार केला. अन्य फलंदाज झटपट बाद झाल्याचा फटका गुजरात संघाला बसला. सिमरन शेख (१८) व तनुजा कंवर (१०) यांनी अखेरच्या षटकांत रोमांच आणला होता. परंतु, दोघी लागोपाठ बाद झाल्या आणि गुजरातचा पराभव निश्चित झाला. गुजरातने २० षटकात नऊ बाद १७० धावा काढल्या. 

गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १७९ धावा केल्या. मुंबईसाठी सर्वाधिक ५४ धावांची खेळी कर्णधार हरमनप्रीत कौरने केली. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी करताना एकूण २५ चौकार मारले आणि ४ षटकार ठोकले.

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय चांगला ठरला कारण मुंबईने ४६ धावांनी २ विकेट गमावल्या. पण त्यानंतर, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर ब्रंट यांच्यातील ५९ धावांच्या भागीदारीमुळे गुजरातचा संघ बॅकफूटवर गेला. दरम्यान, अमनजोत कौरने १५ चेंडूत २७ धावांच्या वादळी खेळीमध्ये ३ चौकार आणि १ षटकार मारला.

कर्णधार हरमनप्रीत कौरची वादळी फलंदाजी
सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेली मॅथ्यूज २७ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर फलंदाजीला आली. हरमनप्रीतने पहिल्या १० चेंडूत खूप हळू धावा काढल्या, पण डावाचे ११ वे षटक सुरू होताच तिने वेगाने फटके मारण्यास सुरुवात केली. हरमनप्रीतने ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि तिचा डाव ३३ चेंडूत ५४ धावांवर संपला.

नॅट सायव्हर-ब्रंटने मोडला विक्रम मुंबई इंडियन्सचा नॅट सायव्हर ब्रंट आता महिला प्रीमियर लीगच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. तिने आतापर्यंत ३४७ धावा केल्या आहेत. गेल्या हंगामात आरसीबीकडून खेळताना अ‍ॅलिस पेरीनेही तेवढ्याच धावा केल्या होत्या. आता जर ब्रंटने पुढच्या सामन्यात आणखी एक धाव केली तर ती महिला प्रीमियर लीगच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *