
छत्रपती संभाजीनगर ः टीआरएस फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हाय टच बुटीक बुद्धिबळ स्पर्धेत भूमिका वागळे हिने विजेतेपद पटकावले तर पलक सोनी हिने उपविजेतेपद संपादन केले.
पाटोदा परिसरातील चेसलँड या ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. हाय टच बुटीकने या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली. ११ हजार रोख पारितोषिक व २० खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिबळ संच असे पारितोषिक देण्यात आले. हाय टच बुटीकच्या संचालिका सारिका गोयंका यांनी ही पारितोषिके दिली. सागर स्पोर्ट्सचे मुख्य संचालक राजेंद्र सागर यांनी बुद्धिबळ संच प्रायोजित केले होते.
या स्पर्धेत ३० महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात आठ मानांकित महिला बुद्धिबळपटूंचा समावेश होता. भूमिका वागळे हिने पाच पैकी पाच गुण घेऊन अपराजित राहिली. सोनी पलक ही उपविजेती ठरली. समृद्धी कांबळे हिने तृतीय क्रमांक, भक्ती गवळी हिने चौथा क्रमांक मिळवला. साक्षी चव्हाण हिने पाचवा क्रमांक संपादन केला. या पाच खेळाडूंना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
जिनल वकील, रेणुका गोविंदवार, अर्चना सोनवणे, किरण चव्हाण, विशुद्धी कांबळे, लाब्धी साकला, काव्या वाघचौरे, राजनंदिनी ठोंबरे, श्रेया शेळके, स्वरा लड्डा, श्रेया पारिपल्ली (परभणी) यांनी पारितोषिके संपादन केली. तसेच ओवी दरवंते, नभा कदम, ख्याती साकला, नित्या पारिटकर, आर्या अदवंत, वेदिका काळे, ईश्वरी काळे यांनी आपाल्या वयोगटात पारितोषिके मिळवली.
हाय टच बुटीकच्या संचालिका सारिका गोयंका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, तेजस्विनी सागर, सिया सागर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. मुख्य पंच म्हणून अजय पटेल यांनी काम पाहिले. या प्रसंगी अंजली सागर यांची प्रमुख उपस्थिती होती.