
गतविजेत्या आरसीबी संघाचा सलग पाच पराभवानंतर विजय
मुंबई : सलग पाच पराभवानंतर गतविजेत्या आरसीबी संघाने मुंबई इंडियन्स संघाची विजयी घोडदौड रोखली. मुंबई इंडियन्स संघ महत्त्वाच्या सामन्यात ११ धावांनी पराभूत झाला. खरे तर हा सामना आरसीबीपेक्षा मुंबई संघासाठी महत्त्वाचा होता. या सामन्यात विजय मिळाला असता तर मुंबई संघ थेट अंतिम फेरीत पोहोचला असता. परंतु, आता मुंबई संघाला एमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स संघाशी खेळावे लागणार आहे. मुंबईच्या पराभवाचा सर्वाधिक फायदा दिल्लीला झाला आणि १० गुणांसह दिल्ली संघ थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे.
मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघ २० षटकात नऊ बाद १८८ धावा काढू शकला. हेली मॅथ्यूज व अमेलिया केर या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली. परंतु, अमेलिया केर (९) व मॅथ्यूज (१९) या लागोपाठ बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर फक्त २० धावा काढून बाद झाली. किम गार्थ हिने हरमनप्रीतला बाद करुन मुंबई संघाला मोठा धक्का दिला. ११व्या षटकारहरमनप्रीत बाद झाली तेव्हा मुंबईची स्थिती तीन बाद ७८ अशी बिकट झाली. धावगती प्रति षटकामागे १२ पेक्षा अधिक झाली. याचा मोठा दबाव मुंबई संघावर आला.

नॅट सायव्हर ब्रंट हिने एकाकी झुंज देत अवघ्या ३५ चेंडूत ६९ धावांची वादळी खेळी केली. तिने दोन उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. एलिस पेरीला षटकार मारण्याच्या प्रयत्नात ब्रंट बाद झाली. पेरीने तिचा झेल घेत विजयातील मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर संजीवन संजना (२३), संस्कृती गुप्ता (१०) यांनी निकराचा प्रयत्न केला. परंतु, मुंबई संघ रोमांचक लढतीत ११ धावांनी पराभूत झाला. आरसीबी संघाकडून स्नेह राणा हिने २६ धावांत तीन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. किम गार्थ (२-३३), एलिस पेरी (२-५३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
आरसीबी तीन बाद १९९
प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १९९ धावा केल्या. अखेर, आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाचा ५ डावांचा अर्धशतकांचा दुष्काळ संपला आहे. मानधनाने ५३ धावांची खेळी केली. एलिस पेरी हिने दमदार अर्धशतक झळकावले. लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना होता. गतविजेता आरसीबी संघ सलग ५ पराभवांना सामोरे गेल्यानंतर आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरला होता. मुंबई संघाने खराब क्षेत्ररक्षण केले आणि त्याचा फटका मुंबईला बसला.
कर्णधार स्मृती मानधना आणि सब्बिनेनी मेघना यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. मेघनाने १३ चेंडूत २६ धावांची तुफानी खेळी केली, तर कर्णधार मानधनाने ३७ चेंडूत ५३ धावा केल्या. सुरुवातीपासून एलिस पेरी आरसीबी संघासाठी समस्या निवारक ठरली आहे. यावेळीही तिने नाबाद ४९ धावा करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात मोठे योगदान दिले. तिच्याशिवाय, रिचा घोष देखील मागील सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तिने ३६ धावा केल्या.
शेवटच्या ४ षटकांत ६५ धावा
एकेकाळी असे वाटत होते की आरसीबी संघ फक्त १६५-१७० धावांपर्यंतच पोहोचू शकेल. संघाचा स्कोअर १६ षटकांत १३४ धावा होता. पण येथून जॉर्जिया वेअरहॅमचे वादळ आले आणि एमआयचे सर्वोत्तम गोलंदाज उडून जाताना दिसले. आरसीबीने शेवटच्या ४ षटकांत एकूण ६५ धावा केल्या. दरम्यान, वेअरहॅमने फक्त १० चेंडूत ३१ धावांची शानदार खेळी केली. या डावात तिने ५ चौकार आणि १ षटकार मारला.
मुंबईकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी अमेलिया केर आली. एलिस पेरी आणि जॉर्जिया वेअरहॅम यांनी तिच्या षटकात २१ धावा फटकावल्या. या षटकात ३ चौकार आणि एक षटकार मारला. पेरी अखेर ४९ धावा करून नाबाद राहिली.