
नवी दिल्ली ः आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी बाकी आहे. मात्र, राजस्थान रॉयल्स संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे जखमी झाले आहेत.
द्रविड यांच्या पायाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनेच याची पुष्टी केली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी द्रविड यांची दुखापत राजस्थान संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. क्रिकेट खेळत असताना त्यांना ही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, “मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना डाव्या पायाला दुखापत झाली. द्रविड दुखापतीतून बरे होत आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रात द्रविड यांच्या डाव्या पायावर प्लास्टर लावलेला दिसत आहे.
राहुल द्रविड गेल्या वर्षी प्रशिक्षकपदी
राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०२४ चा टी २० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर, मेगा लिलावापूर्वी द्रविड यांना आयपीएल २०२५ साठी राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. येत्या हंगामात, द्रविड कर्णधार संजू सॅमसन आणि आरआरचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांच्यासोबत जवळून काम करताना दिसेल.
राजस्थानचा पहिला सामना कधी होईल?
आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यांचा पहिला सामना खेळेल. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. त्यांचा दुसरा सामना २६ मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होईल. राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. राजस्थान क्वालिफायर २ सामन्यात राजस्थानला एसआरएचकडून पराभव पत्करावा लागला होता. राजस्थानने शेवटचे २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती.