
देवगिरी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात सुप्रसिद्ध अभिनेत्री गौरी नलावडे यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले कलागुण व क्षमता ओळखून त्यावर प्रेम करावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री गौरी नलावडे यांनी केले.
देवगिरी महाविद्यालयातील कला, विज्ञान, वाणिज्य, जैवतंत्रज्ञान, संगणक शास्त्र, व्यवस्थापनशास्त्र या विविध शाखांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी, शेलापागोटे, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप मोठ्या उत्साहात झाला.
या पारितोषिक वितरण समारंभासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री गौरी नलावडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून त्रिंबकराव पाथ्रीकर, अनिल पटेल, नीलिमा सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, पारितोषिक वितरण समारंभाचे समन्वयक आणि उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी विद्यार्थ्यांची संवाद साधताना सिने अभिनेत्री गौरी नलावडे म्हणाल्या की, तारुण्याचे वय हे खरे कलागुण जोपासण्याचे वय आहे असे मी मानते. कारण मी याच संस्कारातून घडली आहे. माझी आई माझ्या कलागुणांना सातत्याने वाव देण्यासाठी माझी पाठ राखण करत होती. आपणही तरुण आहात विद्यार्थी वयामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सारखे व्यासपीठ महाविद्यालय आपणास उपलब्ध करून देत असतात. या व्यासपीठातूनच आपण आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. कलागुण जोपासले पाहिजे असे ते म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी आपल्यात असणाऱ्या कलागुणांना आणि क्षमतांना योग्य वेळी ओळखले पाहिजे. आपल्यात असणाऱ्या क्षमतांना योग्य वेळी संधी मिळाली तर भविष्यात यशस्वी कलावंत निर्माण होण्याची शाश्वती असते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर म्हणाले की, देवगिरी महाविद्यालय हे नामवंत कलावंत घडवण्याचे व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर विविध खेळाडू गुणवंत कलावंत घडवण्याचे काम या महाविद्यालयाने केले आहे. या महाविद्यालयाने कला, क्रीडा, सामाजिक बांधिलकी, गुणवत्ता सातत्याने जोपासली आहे. या माध्यमातून देवगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभाचे समन्वयक व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांनी केला. या प्रसंगी वर्षभरात विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या नामवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. महाविद्यालयातील शैक्षणिक वर्षामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आले. यात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठ युवक महोत्सव, एनसीसी, विविध क्रीडा स्पर्धेत विभागीय राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडूंचे तसेच वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धा, आनंदनगरी, अविष्कार या स्पर्धेमध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. देवगिरी महाविद्यालयातील प्राध्यापकांना पीएच डी ही पदवी मिळाली तसेच सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झाले अशा प्राध्यापकांचाही याप्रसंगी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ बाळासाहेब निर्मळ यांनी केले.