
आशिया कप, टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा समावेश
मुंबई ः आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आयपीएल स्पर्धेत वेगवेगळ्या संघांमध्ये विभागला जाईल आणि पुढील दोन महिन्यांत एकमेकांविरुद्ध स्पर्धा करेल. इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. मेगा लिलावानंतर एक नवीन चक्र सुरू होत आहे. त्यामध्ये अनेक टॉप स्टार नवीन संघांसाठी खेळतील आणि बहुतेक फ्रँचायझींनी नवीन कर्णधारांसह खेळण्याची घोषणा केली आहे.
भारतीय संघाचे पुढील आव्हान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. ही मालिका २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात करेल. यावेळी भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही म्हणून भारताचे लक्ष्य चौथ्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे आहे. २०२१-२२ मध्ये भारताला अगदी कमी फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे १८ वर्षांच्या अंतरानंतर पतौडी ट्रॉफी जिंकायची भारतालाही इच्छा असेल. २०२४-२५ हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर नवीन कर्णधारपद भूषवू शकतो, त्यामुळे ही मालिका देशासाठी रेड-बॉल क्रिकेटमध्ये एक नवीन सुरुवात ठरू शकते.
२०२६ चा टी २० विश्वचषक हा पुढील आयसीसी स्पर्धा असल्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील लक्ष टी २० क्रिकेटकडे वळेल. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर जेतेपदाचे रक्षण करण्याचे भारताचे ध्येय असेल. श्रीलंका देखील या स्पर्धेचे आयोजन करेल. पुढील १२ महिन्यांत भारत नऊ कसोटी सामने आणि १२ एकदिवसीय सामने खेळेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ आशिया कप आणि टी २० विश्वचषक सामन्यांव्यतिरिक्त १८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची हमी देतो.
भारताचा कार्यक्रम
भारतीय संघ २१ जून ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत इंग्लंड दौऱ्यावर ५ कसोटी सामने खेळेल. ऑगस्टमध्ये भारताला बांगलादेश दौऱ्यावर ३ एकदिवसीय सामने आणि तेवढेच टी २० सामने खेळायचे आहेत. आशिया कप सप्टेंबर २०२५ मध्ये होणार आहे. वेस्ट इंडिज संघ ऑक्टोबरमध्ये २ कसोटी सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येईल. त्यानंतर भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. येथे ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये भारत दौऱ्यावर दोन कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामने खेळायचे आहेत. नवीन वर्षात, न्यूझीलंड संघ जानेवारीमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारताचा दौरा करेल. फेब्रुवारी-मार्चमध्ये टी २० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे.