
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट : सलमान अहमद सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक करंडक टी २० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलिस ब संघाने अटीतटीच्या सामन्यात ग्रामीण पोलिस संघाचा दोन विकेट राखून पराभव केला. या सामन्यात सलमान अहमद याने सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर प्रकाशझोतात हा सामना झाला. ग्रामीण पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. २० षटकांच्या खेळात ग्रामीम पोलिस संघाने २० षटकात सात बाद १३४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. शहर पोलिस ब संघाने या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना १९.२ षटकात आठ बाद १३५ धावा फटकावत दोन विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात विकास नगरकर याने ४३ चेंडूत ५२ धावांची दमदार अर्धशतकी खेळी साकारली. विकासने आठ सुरेख चौकार मारले. बाबासाहेब याने २२ चेंडूत २८ धावांची वेगवान खेळी केली. त्याने एक षटकार व चार चौकार मारले. मोहम्मद अमान याने तीन चौकारांसह २६ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत सुरज गोंड याने २५ धावांत तीन गडी बाद केले. सलमान अहमद याने १२ धावांत दोन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संजय सपकाळ याने ३३ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : ग्रामीण पोलिस संघ : २० षटकात सात बाद १३४ (सुरज गोंड २४, विकास नगरकर ५२, इनायत अली ५, फेरोज पठाण २१, संदीप जाधव ५, संजय सपकाळ नाबाद ५, युनूस शेख नाबाद ८, सलमान अहमद २-१२, आसिफ शेख १-३०, जीवन बावस्कर १-३२, पांडुरंग वाघमोडे १-२७, मोहम्मद अमन १-१८) पराभूत विरुद्ध शहर पोलिस ब संघ : १९.२ षटकात आठ बाद १३५ (आसिफ खान २०, सलमान अहमद ६, मोहम्मद अमन २६, रिझवान अहमद ६, आसिफ शेख १७, पांडुरंग वाघमोडे ८, जीवन बावस्कर नाबाद १३, बाबासाहेब नाबाद २८, सुरज गोंड ३-२५, संजय सपकाळ २-३३, युनूस शेख १-३०). सामनावीर : सलमान अहमद.