
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट ः लहू लोहार सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत नॉन स्ट्रायकर्स संघाने रोहन रॉयल्स संघावर सहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या लढतीत लहू लोहार याने सामनावीर पुरस्कार पटकावला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. नॉन स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रोहन रॉयल्स संघाला २० षटकात आठ बाद १४२ धावसंख्येवर रोखले. त्यानंतर या धावसंख्येचा पाठलाग करताना नॉन स्ट्रायकर्स संघाने ११.१ षटकात चार बाद १४३ धावा फटकावत सहा विकेट राखून मोठ्या फरकाने सामना जिंकला.

या सामन्यात इरफान पठाण याने अवघ्या २१ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. इरफानने ५१ धावांची वादळी खेळी करताना तब्बल आठ टोलेजंग षटकार ठोकत मैदान गाजवले. सिद्धांत पटवर्धन याने १८ चेंडूत ४० धावांची धमाकेदार खेळी केली. सिद्धांत याने चार उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. विशाल नरवडे याने ३६ चेंडूत ४० धावा फटकावल्या. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत लहू लोहार याने २१ धावांत चार विकेट घेतल्या. अष्टपैलू कामगिरीमुळे लहू लोहार हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मयंक विजयवर्गीय याने २४ धावांत तीन गडी बाद केले. गिरीश खत्री याने २६ धावांत दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक ः रोहन रॉयल्स संघ ः २० षटकात आठ बाद १४२ (विशाल नरवडे ४०, सतीश भुजंगे १४, डॉ मयूर राजपूत २२, रोहन राठोड २८, सम्राट गुट्टे १४, राजेंद्र चोपडा ६, मयंक विजयवर्गीय नाबाद ९, मिलिंद पाटील नाबाद ३, लहू लोहार ४-२१, गिरीश खत्री २-२६, सुमित आगरे १-१८, शेख सादिक १-३५) पराभूत विरुद्ध नॉन स्ट्रायकर्स संघ ः ११.१ षटकात चार बाद १४३ (इरफान पठाण ५१, सिद्धांत पटवर्धन ४०, आसिफ खान ६, शेख सादिक ५, लहू लोहार नाबाद १०, गिरीश खत्री नाबाद २१, इतर १०, मयंक विजयवर्गीय ३-२४, विनोद यादव १-३५). सामनावीर ः लहू लोहार.