मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा चॅम्पियन

  • By admin
  • March 15, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

दिल्ली कॅपिटल्स संघाची उपविजेतेपदाची हॅटट्रिक

मुंबई : मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिल्टल्स संघाचा रोमहर्षक सामन्यात ८ धावांनी पराभव करत महिला प्रीमियर लीग ट्रॉफी दुसऱ्यांदा जिंकली. कर्णधार हरमनप्रीत कौरची (६६) धमाकेदार फलंदाजी व गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी निर्णायक ठरली. सलग तिसऱ्यांदा फायनल गाठून देखील दिल्ली संघ उपविजेता ठरला हे विशेष.

२०२३ मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघाला नमवून विजेतेपद पटकावले होते. २०२४ मध्ये आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्स संघावर विजय साकारत विजेतेपद पटकावले होते. यंदा दिल्ली संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली. मुंबई संघाने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली.

दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी १५० धावांचे आव्हान होते. दिल्लीच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार मेग लॅनिंग (१३) व शेफाली वर्मा (४) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर ठराविक अंतराने दिल्ली संघाने दबावात विकेट गमावल्या. जेमिमा रॉड्रिग्ज हिने ३० धावा काढल्या. तिने २१ चेंडूत चार चौकार मारले. जेस जोनासेन (१३), अॅनाबेल सदरलँड (२), सारा ब्राइस (५) या स्वस्तात बाद झाल्या.

मॅरिझॅन कॅप हिने २६ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करुन सामन्यात रोमांच आणला होता. तिने दोन षटकार व पाच चौकार मारले. परंतु, ब्रंट हिने कॅप व शिखा पांडे (०) यांना लागोपाठ बाद करुन विजयाचे पारडे मुंबई संघाकडे झुकवले. निकी प्रसादने नाबाद २५ धावांचे योगदान देत शेवटपर्यंत झुंज दिली. ब्रंट हिने ३० धावांत तीन विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले. अमेलिया केर हिने २५ धावांत दोन गडी बाद केले. दिल्ली कॅपिटल्स संघ २० षटकात नऊ बाद १४१ धावा काढू शकला.

हरमनप्रीत कौरची धमाकेदार कामगिरी

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर ब्रंट यांच्या महत्त्वपूर्ण ८९ धावांच्या भागीदारीमुळे मुंबई इंडियन्स संघाने २० षटकात सात बाद १४९ धावसंख्या उभारली. विजेतेपदाच्या लढाईत नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकांत सात गडी गमावून १४९ धावा केल्या. दिल्लीकडून मारिजन कॅप, जेस जोनासन आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर अ‍ॅनाबेल सदरलँडने एक विकेट घेतली.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात मुंबईच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. नॅट सायव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर वगळता मुंबईचा कोणताही फलंदाज दिल्लीच्या घातक गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. संघाने १४ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. मॅरिझॅन कॅपने हेली मॅथ्यूज (३) आणि यास्तिका भाटिया (८) यांच्या विकेट घेतल्या. त्यानंतर, ब्रंट आणि कॅप्टन कौर यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये ६२ चेंडूत ८९ धावांची भागीदारी झाली. श्री चरणी हिने ब्रंटला झेलबाद केले. ती ३० धावा करून बाद झाली. त्याच वेळी, हरमनप्रीतने ४४ चेंडूत ६६ धावा फटकावल्या. तिने २ षटकार व ९ चौकार मारले. अमेलिया केर (२), जी कमलिनी (१०), अमनजोत कौर (नाबाद १४) आणि संस्कृती गुप्ता (नाबाद ८) यांनी आपले योगदान दिले. सजीवन सजना धावांचे खाते उघडू शकली नाही.

नॅट सायव्हर-ब्रंटने रचला इतिहास

नॅट सायव्हर-ब्रंट ही महिला प्रीमियर लीग इतिहासात एकाच हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिली खेळाडू ठरली आहे. तिने यंदाच्या हंगामात एकूण ५२३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *