
दिव्यांग खेळाडू विकास बेलदारचा सत्कार
नंदुरबार ः महाराष्ट्र पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पॅरा ऑलिम्पिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याच्या विकास रवींद्र बेलदार याने गोळाफेक प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या रुपेरी यशाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेत विकास बेलदार याने उत्कृष्ट प्रदर्शन करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र राज्य स्पेशल ऑलिम्पिक भारत संघटनेचे महासचिव डॉ भगवान तलवारे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, डी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक पंकज पाठक, श्रॉफ हायस्कूलचे उपमुख्याध्यापक राजेश शहा, क्रीडा शिक्षक डॉ मयूर ठाकरे, जगदीश वंजारी आणि भरत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ तलवारे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात. अशा खेळाडूंना आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. विकास बेलदार यांच्या या यशामुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.