सायकलिंगचे आधारस्तंभ प्रताप जाधव यांचे निधन

  • By admin
  • March 16, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

पुणे : सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचे रविवारी पहाटे ३.३० च्या सुमारास आकस्मिक निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

प्रताप जाधव यांनी आपले संपूर्ण आयुष्य सायकलिंग खेळासाठी समर्पित केले. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनमध्ये त्यांनी विविध पदे भूषवली. त्यांनी आपल्या कारकीर्दी दरम्यान मुंबई-पुणे आणि पुणे-नाशिक सायकल शर्यतींमध्ये विविध शर्यतींचे देखील आयोजन केले होते. भारतामधील सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱया “जीवन गौरव” पुरस्काराने महाराष्ट्राच्या प्रताप जाधव यांना नवी दिल्ली येथे झालेल्या समरंभात सन्मानित करण्यात आले होते.

प्रताप जाधव यांनी १९७७ ते १९८७ दरम्यान खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवली. यात राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहा वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते. दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली होती. प्रताप जाधव यांनी दोन वेळा राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. १९९३ पासून राज्य तसेच राष्ट्रीय सायकलिंग संघटनेत विविध पदावर काम केले. संघटक म्हणून आपल्या ४० वर्षांच्या काळात प्रताप जाधव यांनी २३ वेळा मुंबई-पुणे सायकल स्पर्धा, १५ वेळा एमटीबी, ४ वेळा रो़ड आणि एकदा ट्रॅक अशा २० राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा, १० वेळा राष्ट्रीय शालेय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.

स्व सुभेदार मेजर शंकरराव जाधव यांचे ते चिरंजीव होते. त्यांच्या मागे २ मुलगे, पत्नी आणि सून असा परिवार आहे. ते अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आणि माजी उपाध्यक्ष रवी जाधव यांचे बंधू होते. प्रतिशिर्डी साईबाबा मंदिराचे विश्वस्त आणि दुर्गम प्रतिष्ठानचे सल्लागार रवी जाधव यांचे बंधू होत. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रातील सच्चा कार्यकर्ता

क्रीडा क्षेत्रातील अतिशय सच्चा कार्यकर्ता ज्यांनी सायकलिंग खेळासाठी महाराष्ट्रातल्या खेळाडूंच्यासाठी स्वतःला झोकून दिले. अनेक खेळाडूंना मदत करून आज कित्येक खेळाडूंना नॅशनल पातळीवर पोहोचवण्याचे बहुमोल काम करणारे माझे मित्र प्रताप जाधव यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी मोठी वाईट बातमी आहे. तो सर्व खेळांच्या अन्याय विरुद्ध लढणारा योद्धा होता, तो एक क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकार होता. जे काही क्रीडा क्षेत्रामध्ये वावगं किंवा अन्याय झालेला असेल त्याबाबतीत स्पष्टपणे लिहिणारा हा एक महाराष्ट्रीयन पत्रकार म्हणून क्रीडा क्षेत्रात त्याचे नाव घेतले तर वावग ठरणार नाही. त्याला माझ्याकडून आणि आपल्या सर्व कबड्डी योद्ध्यांकडून श्रद्धांजली अर्पण करतो.

  • शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डी खेळाडू व संघटक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *