
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट ः अलोक खांबेकर, इनायत अली, इंद्रजीत उढाणची शानदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राऊडी सुपर किंग्ज संघाने श्लोक वॉरियर्स संघावर सहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवत आगेकूच कायम ठेवली. या लढतीत इनायत अली याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. श्लोक वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय श्लोक वॉरियर्स संघासाठी प्रचंड महागात पडला. श्लोक वॉरियर्स संघ १२.१ षटकात अवघ्या ५९ धावांत सर्वबाद झाला. राऊडी सुपर किंग्ज संघाने अवघ्या ८.३ षटकात चार बाद ६२ धावा फटकावत सहा विकेट राखून सामना जिंकला. अलोक खांबेकर, इनायत अली, इंद्रजीत उढाण व विराज चितळे यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर श्लोक संघाचा डाव गडगडला.

कमी धावसंख्येच्या या सामन्यात इंद्रजीत उढाण याने २२ चेंडूत २४ धावा फटकावल्या. इंद्रजीतने तीन चौकार मारले. ज्ञानेश्वर पाटील याने १० चेंडूत दोन उत्तुंग षटकार ठोकत १३ धावा काढल्य़ा. मयूर चौधरी याने सात चेंडूत १२ धावांचे योगदान दिले. मयूरने तीन चौकार मारले. गोलंदाजीत इनायत अली याने १५ धावांत तीन विकेट घेत प्रभावी कामगिरी नोंदवली. अलोक खांबेकर याने २१ धावांत तीन विकेट घेत शानदार कामगिरी बजावली. अब्दुल वहाब याने १६ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः श्लोक वॉरियर्स ः १२.१ षटकात सर्वबाद ५९ (ज्ञानेश्वर पाटील १३, मयूर अग्रवाल ६, सय्यद फरहान ५, पवन इप्पर नाबाद ८, शुभम अग्रवाल १०, प्रमोद उघाडे ७, अलोक खांबेकर ३-२१, इनायत अली ३-१५, इंद्रजीत उढाण २-१३, विराज चितळे २-७) पराभूत विरुद्ध राऊडी सुपर किंग्ज ः ८.३ षटकात चार बाद ६२ (इंद्रजीत उढाण नाबाद २४, मयूर चौधरी १२, इनायत अली ५, सनी नाबाद १२, अब्दुल वहाब २-१६, मयूर अग्रवाल २-३६). सामनावीर ः इनायत अली.