
भाजपा क्रीडा प्रकोष्ट व न्यू सोलापूर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा किशोरी खो-खो स्पर्धा
सोलापूर ः सोलापूर जिल्हा किशोरी १४ वर्षांखालील गटाच्या खो-खो स्पर्धेत साकत प्रशाला बार्शी व समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर आणि केके स्पोर्ट्स क्लब वाडीकुरोली व न्यू सोलापूर क्लब यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ट व न्यू सोलापूर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही किशोरी जिल्हा निमंत्रित खो- खो स्पर्धा नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरू झाली.

या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे माजी नगरसेवक नागपुरे, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंडी, भाजपचे सरचिटणीस नागेश सरगम, विशाल गायकवाड, युवा सरचिटणीस महेश देवकर, सोलापूर शहर क्रीडा प्रकोष्ट यशवंत पाथरूट, न्यू सोलापूरचे क्लबचे अध्यक्ष मनोज सांगावर, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव ए बी संगवे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, पंच मंडळ सचिव गोकुळ कांबळे, सहसचिव अजित शिंदे, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, सहसचिव पुंडलिक कलखांबकर, माजी तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव, सोनाली केत आदी उपस्थित होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय जलतरण खेळाडू श्रावणी सूर्यवंशी, रणवीर खाडे, सर्वेश स्वामी, राष्ट्रीय खो-खो खेळाडू लाला राठोड, कराटे खेळाडू मिहीर जाधव, जलतरण प्रशिक्षक श्रीकांत शेटे, बॅडमिंटन प्रशिक्षक सुनील देवांग, सूर्याजी लिंगडे, योग प्रशिक्षक सुभाष उपासे, उद्योजक नरेंद्र चाटे, अशोक पाटील, प्रमोद कुलाल, अनिल स्वामी व निवृत्त पोलिस उपनिरीक्षक अनिल वळसंगे यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे संयोजक यशवंत पाथरूट, संतोष कदम व आनंद जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या स्पर्धेतून महाराष्ट्र शासन क्रीडा खात्याच्या वतीने आयोजित केलेल्या भाई नेरुरकर करंडक राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे. हे संघ राजाराम शितोळे, प्रथमेश हिरापुरे व अतुल जाधव हे निवड समिती सदस्य निवडणार आहेत.
या स्पर्धेतील विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांकाच्या संघास अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार तर अष्टपैलू, आक्रमक व संरक्षक अशी प्रत्येकी एक हजार रुपयाची तीन पारितोषिके व करंडक ठेवण्यात आली आहेत. ही पारितोषिके कै विमल कदम यांच्या स्मरणार्थ व आरंभ फाउंडेशनतर्फे देण्यात आली आहेत.