
सर्वेश दामले, निराली पटेल, चेतन भोगटे, अथर्व वेंगुर्लेकर, पारस मुंडेकर चमकले
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या यूथ गेम्समध्ये पार पडलेल्या बुद्धिबळ या खेळात रत्नागिरी व सिंधुदुर्गने बाजी मारली. या स्पर्धेत गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर येथून खेळाडू सहभागी झाले होते.
ही स्पर्धा सात गटांमध्ये पार पडली. या स्पर्धेत तब्बल १२४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात रत्नागिरी येथील सर्वेश दामले याने विजेतेपद पटकावले. सई देव व यथार्थ डांगी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला. १६ वर्षांखालील मुलींच्या गटात निराली पटेल हिने विजेतेपद संपादन केले. गार्गी सावंत व चिन्मयी देवधर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
१५ वर्षांखालील गटात चेतन भोगटे याने अजिंक्यपद मिळवले. पुष्कर केळुस्कर व नंदन दामले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. १२ वर्षांखालील गटात अथर्व वेंगुर्लेकर याने विजेतेपद मिळवले. चिदानंद रेडकर व राघव पाध्ये यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. नऊ वर्षाखालील गटात पारस मुंडेकर याने विजेतेपद मिळवले. आशुतोष कुलकर्णी याने द्वितीय तर अर्णव कांबळी याने तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय मानांकन गटातील हर्षवर्धन भिंगे याला सुवर्ण, आरिफ दिवेकर याला रौप्य व तनिष तेंडुलकर याला कांस्यपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी झालेले ९ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त होते. या स्पर्धेतील सर्वोच्च गुणांकन प्राप्त खेळाडूला १५१६ गुणांकन प्राप्त होते. त्यामुळे ही स्पर्धा अधिक चुरशीची आणि रंगतदार झाली. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने आपले कौशल्य पणाला लावलेले दिसून आले. शेवटच्या क्षणी परीक्षकांना देखील अगदी कसोशीने खेळाडूंचे गुणांकन करावे लागले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे परीक्षक विवेक सोहनी यांनी या स्पर्धेचे कामकाज पाहिले.