डेरवण यूथ गेम्सच्या शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरचे निर्विवाद वर्चस्व

  • By admin
  • March 17, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील सावर्डे डेरवण येथील यूथ गेम्सच्या शूटिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. या स्पर्धेत एकूण ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील कोल्हापूरच्या २० स्पर्धकांनी प्रावीण्य मिळवून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. त्याखालोखाल रत्नागिरी ४, सोलापूर व सातारा प्रत्येकी ३, मुंबई २ व सिंधुदुर्ग १ अशा खेळाडूंनी यश प्राप्त केले. 

कोल्हापूरच्या वेध रायफल ॲन्ड शूटिंग अकादमीच्या १२ खेळाडूंनी यश मिळविताना त्यांना कोल्हापूरच्याच सक्सेस शूटिंग अ‍ॅकॅडमी ३, ड्रिम ऑलिम्पियन शूटिंग रेंज १, डी. वाय. पाटील विद्यानिकेतन १, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल १, लक्षवेध अकॅडमी १ व योगी प्रभुनाथ महाराज हायस्कूल १ अशा ८ खेळाडूंनी साथ दिली. 


डेरवण यूथ गेम्सच्या विविध प्रकारात १४, १७ वयोगटातील स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले. पिप साईट प्रकारात १४ वर्षांखालील मुलांमध्ये एसव्हीजेसीटी डेरवणचा हर्ष बागवे, वेध कोल्हापूरचा शर्व घुगरे व सिंधुदुर्गचा शिवम चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात बीईएस मेमन मुंबई उपनगर हायस्कूलची जानकी महाडिक, ड्रीम कोल्हापूरची मुस्कान मुलानी व जिंदाल विद्यामंदिर, जयगड रत्नागिरीची देवश्री कासार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. 

पिप साईट प्रकारात १७ वर्षांखालील मुलांमध्ये डी. वाय. पाटील कोल्हापूरचा वरदराज पोवार, मुंबई उपनगरातील जनसेवा समिती रायफल पिस्तुल क्लबचा अद्वैत आंब्रे व एसव्हीजेसीटी डेरवणचा यश सावंत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात वेध कोल्हापूरच्या हिरण्या सासने, काव्यांजली नाकटे व युगरत्ना शर्मा आणि सान्वी नाळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.

एअर पिस्तुल प्रकारात १४ वर्षांखालील मुलांमध्ये सक्सेस कोल्हापूरचे दर्श पाटील, आदित्य वायचळ व आर्यमन पिलीव अ‍ॅकॅडमी सोलापूरचा वीरधवन बैस यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात साताऱ्याच्या मेरी माता हायस्कूलची स्वरा कालढोणे, कोल्हापूर सक्सेसची स्वरांजली जाधव व रत्नागिरी सिक्रेड हार्ट हायस्कूलची दुर्गा जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. तसेच एअर पिस्तुल प्रकारात १७ वर्षांखालील मुलींच्या गटात कोल्हापूरच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलची गौरी चव्हाण व साताऱ्याच्या मेरी माता हायस्कूलची पियुषा सानप यांनी घवघवीत यश संपादन केले. 

ओपन साईट प्रकारात १७ वर्षांखालील मुलांमध्ये वेध कोल्हापूरचा तीर्थ पोवार, शिवेंद्र खाटकर व माळशिरस सोलापूरचा विनायक माने यांनी चमकदार कामगिरी नोंदवत यश संपादन केले. मुलींमध्ये लक्षवेध कोल्हापूरची वैष्णवी पाटील, साताऱ्यातील खेर्डी येथील मेरी माता स्कूलची आसावरी मेलावणे व वेध कोल्हापूरची स्नेहांकिता चौगुले यांनी लक्षवेधक कामगिरी नोंदवत यश संपादन केले. 


ओपन साईट प्रकारात १४ वर्षांखालील मुलांमध्ये वेध कोल्हापूरचा ऋग्वेद खोत, चिन्मय बुइंबर व कोल्हापूरच्या योगी प्रभुनाथ महाराज हायस्कूलचा आदित्य पाटील तर मुलींमध्ये वेध कोल्हापूरची भार्गवी पाटील, सान्वी घाटगे व माळशिरस सोलापूरची राजलक्ष्मी शिद या स्पर्धकांनी शूटिंग स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *