
मुंबई ः क्रीडावेध मुंबईच्या वतीने उदयोन्मुख खेळाडू तसेच ज्येष्ठ प्रशिक्षक, संघटक आणि क्रीडा कार्यकर्त्यांचा गौरव सोहळा नुकताच चेंबूर येथील युतोपिया सभागृहात उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला माजी खासदार मनोज कोटक हे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी बृहन्मुंबई विभागातील १५ क्रीडा प्रकारांतील ९० खेळाडू व क्रीडा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. खेळाडूंना क्रीडावेध खेळाडू पुरस्कार, तर अनुभवी प्रशिक्षक आणि संघटकांना क्रीडावेध ज्येष्ठ संघटक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थींना गौरवचिन्ह आणि रोख रकमेचे स्वरूपात सन्मानित करण्यात आले.
प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या खेळाडूंना सन्मान मिळतो, मात्र चौथ्या, पाचव्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंनीही मोठी मेहनत घेतलेली असते. त्यांनाही प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असे मत क्रीडावेधचे अध्यक्ष मनोज कोटक यांनी यावेळी व्यक्त केले.
राष्ट्रीय क्रीडा दिन आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू झालेल्या क्रीडावेध पुरस्कार योजनेंतर्गत कबड्डी, खो-खो, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, पॉवरलिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, कुस्ती, बॉक्सिंग, तलवारबाजी, थ्रोबॉल, ज्युदो, तायक्वांदो या सारख्या खेळांचे प्रतिनिधी आणि खेळाडूंच्या सहभागाने हा सोहळा विशेष उत्साहात पार पडला.
या वेळी बृहन्मुंबईतील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक, क्रीडा कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. क्रीडावेध समितीच्या दूरदृष्टीने आखलेल्या योजनांमुळे आगामी काळात बृहन्मुंबई विभागातील क्रीडा चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. याप्रसंगी ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, संजय सरदेसाई, गुरुनाथ मिठबावकर, रविराज ईळवे, महेंद्र चेंबूरकर आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.