
लातूर ः राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावणारा स्वामी विवेकानंद विद्यालयाचा खेळाडू शंतनु धायगुडे याचा सत्कार करण्यात आला.
भारतीय शालेय महासंघाद्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजीनगर तसेच महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक साह्याने व छत्रपती संभाजीनगर सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६८व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये श्री स्वामी विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी शंतनु राहुल धायगुडे याची निवड महाराष्ट्राच्या संघात झाली होती. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये शंतनु धायगुडे याने उल्लेखनीय कामगिरी केली. शंतनुला या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव प्रदीप तळवेलकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव गोकुळ तांदळे, सॉफ्टबॉल राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, संघटनेचे पदाधिकारी, पंच, मार्गदर्शक अक्षय येवले, गणेश बेटुदे यांच्यासह आदी मान्यवरांनी ‘होमर बॉय’ म्हणून सन्मानित केले. त्याच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक महाराष्ट्रभर होत आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र मुले व मुलींच्या संघांनी विजेतेपदाचा दुहेरी मुकुट संपादन केला. शंतनु हा वयाच्या १० व्या वर्षांपासून सराव करत आहे. मेहनत, जिद्द व उत्कृष्ट क्रीडा शैलीच्या जोरावर आजतागायत अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत पदक पटकावले असून सलग दोन वर्षे राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. त्याने २०२३-२४ मध्ये रौप्य पदक पटकावले तर २०२४-२५ मध्ये सुवर्ण पदक विजेता खेळाडू ठरला.
या शानदार यशाबद्दल जेएसपीएम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, कार्यकारी संचालक रणजीत पाटील कव्हेकर, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी सुर्यवंशी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शंतनु धायगुडे याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शंतनु धायगुडे याला मुकेश बिराजदार व निलांबरी बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.