
नवी दिल्ली ः अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी उरुग्वे आणि ब्राझीलविरुद्धच्या आगामी दक्षिण अमेरिकन विश्वचषक पात्रता सामन्यांना मुकणार आहे. प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी जाहीर केलेल्या २५ जणांच्या संघात ३७ वर्षीय मेस्सीचा समावेश नव्हता.
रविवारी एमएलएसमध्ये इंटर मियामीने अटलांटा युनायटेडवर २-१ असा विजय मिळवला तेव्हा मेस्सीला डाव्या मांडीत वेदना झाल्याचे अर्जेंटिनाच्या माध्यमांनी वृत्त दिले. तथापि, अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने त्याच्या अनुपस्थितीची कारणे उघड केली नाहीत.
२५ गुणांसह अव्वल स्थानावर असलेला अर्जेंटिना शुक्रवारी दुसऱ्या स्थानावर असलेल्या उरुग्वेला भेट देईल आणि चार दिवसांनी ब्युनोस आयर्सच्या मोन्युमेंटल स्टेडियमवर पाचव्या स्थानावर असलेल्या ब्राझीलचे यजमानपद भूषवेल. अर्जेंटिनाची पात्रता निश्चित करणाऱ्या दोन सामन्यांमध्ये मेस्सी हा एकमेव अनुपस्थित खेळाडू नाही. पाउलो डायबाला, गोंझालो मोंटिएल आणि जिओवानी लो सेल्सो यांनाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.