
दुसऱ्या टी २० सामन्यात न्यूझीलंड पाच विकेटने विजयी
ड्युनेडिन ः पाकिस्तान संघाच्या पराभवाची मालिका न्यूझीलंड दौऱ्यात कायम राहिली. सलग दुसऱ्या टी २० सामन्यात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला. पावसाने व्यत्यय आणलेल्या हा सामना न्यूझीलंडने पाच विकेट राखून जिंकला. गोठवणाऱ्या थंडीमुळे पराभव झाला अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने व्यक्त केली. त्याचे हे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी ड्युनेडिन येथे खेळवण्यात आला. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर नवनियुक्त कर्णधार सलमान अली आघा खूप निराश दिसत होता. पुरस्कार सोहळ्यादरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना सलमान म्हणाला की, ‘गोठवणारी थंडी होती. आजचा सामना मागच्या सामन्यापेक्षा चांगला होता. आम्ही चांगली फलंदाजी केली. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होते. काही भागात गोलंदाजी चांगली होती. आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की खेळपट्टीचा बाऊन्स वेगळा असतो. पॉवरप्लेनंतर आम्ही चांगली गोलंदाजी केली. विशेषतः हरिस रौफने चांगली गोलंदाजी केली. आम्हाला पॉवरप्लेमध्ये आणखी चांगली कामगिरी करायची आहे. फलंदाजी युनिट म्हणून आपल्याला पॉवरप्लेमध्ये आणि गोलंदाजी युनिट म्हणूनही चांगली कामगिरी करावी लागेल.
पाकिस्तानची फलंदाजी गडगडली
गेल्या सामन्यात न्यूझीलंड गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तान संघाला दुसऱ्या टी २० सामन्यातही विशेष जादू दाखवता आली नाही. पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात कर्णधार सलमान आघा व्यतिरिक्त इतर फलंदाज वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सलमान याने एकूण २८ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने १६४.२९ च्या स्ट्राईक रेटने ४६ धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि तीन उत्कृष्ट षटकार आले.
सलमान नंतर संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू शादाब खान होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण १४ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त, खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या शाहीन आफ्रिदीने १४ चेंडूत २२ धावांचे योगदान दिले. परिणामी, संघाला १५ षटकांत नऊ गडी गमावून १३५ धावा करता आल्या.
न्यूझीलंडचा सहज विजय
न्यूझीलंड संघाने पाकिस्तान संघाने दिलेले १३६ धावांचे लक्ष्य १३.१ षटकात पाच गडी गमावून सहज गाठले. सामन्यादरम्यान, डावाची सुरुवात करणाऱ्या टिम सेफर्टने २२ चेंडूत ४५ धावा केल्या, तर फिन अॅलनने १६ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले.
न्यूझीलंडकडून जेकब डफी, बेन सीयर्स, जेम्स नीशम आणि ईश सोधी यांनी अनुक्रमे प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद अली, खुसदिल शाह आणि जहांदाद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.