
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट : मुकुल जाजू सामनावीर, राहुल शर्माचे धमाकेदार अर्धशतक
छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत डीबीए संघाने शानदार कामगिरी नोंदवत रोमहर्षक सामन्यात महावितरण संघावर अवघ्या एका धावांनी विजय मिळवला. या लढतीत मुकुल जाजू याने धमाकेदार अर्धशतक ठोकत सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. महावितरण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डीबीए संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात बाद १७३ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना महावितरण संघाने धमाकेदार फलंदाजी करत डीबीए संघाच्या गोलंदाजांची कठोर परीक्षा घेतली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या या झुंजीत महावितरण संघाने २० षटकात पाच बाद १७२ धावा फटकावल्या. अवघ्या एका धावेने डीबीए संघाने हा रोमांचक सामना जिंकला.

या रोमाचंक सामन्यात मुकुल जाजू याने ४८ चेंडूत ७७ धावांची धमाकेदार अर्धशतक ठोकले. जाजू याने चार उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. राहुल शर्मा याने ३० चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी करुन सामन्यात रंगत आणली. राहुलने दोन षटकार व सहा चौकार मारले. गौरव शिंदे याने २५ चेंडूत ३५ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार मारले. शशी सपकाळ याने ३५ धावांत तीन विकेट घेतल्या. राम राठोड याने २१ धावांत दोन बळी टिपले. स्वप्नील चव्हाण याने २३ धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : डीबीए संघ : २० षटकात सात बाद १७३ (अजय शितोळे १२, मुकुल जाजू ७७, सुरज १६, गौरव शिंदे नाबाद ३५, हरमितसिंग रागी ६, इतर २१, शशी सपकाळ ३-३५, राम राठोड २-२१, पांडुरंग धांडे १-२४, स्वप्नील चव्हाण १-२३) विजयी विरुद्ध महावितरण संघ : २० षटकात पाच बाद १७२ (राम राठोड ६, पांडुरंग चव्हाण ३४, स्वप्नील चव्हाण ३१, राहुल शर्मा ५०, महेश मुळेकर नाबाद १७, प्रदीप चव्हाण २३, अजय शितोळे १-३४, मोहित घाणेकर १-३४, हरमितसिंग रागी १-२७, दिनकर काळे १-३५). सामनावीर : मुकुल जाजू.